आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latur Municipal Corporation Throws Garbage In Pit Made For Water Recyclation

लातूर महापालिकेचा प्रताप पुनर्भरणाच्या खड्ड्यातच टाकला कचरा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - लातूर महापालिकेच्या अजब कारभाराचे गजब नमुने नेहमीच पाहायला मिळतात. मात्र, गुरुवारी तर कहरच झाला. जिल्हाधिकाऱ्यांच्या दट्ट्यामुळे उन्हाळ्यात जलपुनर्भरणासाठी खोदलेल्या खड्ड्यांमध्ये महापालिकेने चक्क कचरा ओतला आहे. त्यामुळे पाण्याचे पुनर्भरण होणे तर दूरच, उलट कचऱ्यामुळे जमिनीत आहे ते पाणी प्रदूषित होईल, अशी भीती तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

राज्यात जलयुक्त शिवार योजना सुरू झाल्यानंतर लातूरचे जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. ग्रामीण भागात नदी, नाले यांचे खोलीकरण आणि रुंदीकरणाची मोहीम सुरू झाली. आर्ट ऑफ लिव्हिंगसारख्या संस्थांनीही पुढाकार घेतल्यामुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात जलपुनर्भरणाची कामे सुरू झाली. मात्र, लातूर शहरातील पाण्याची पातळी सातशे फुटांपर्यंत खोल गेल्यामुळे तातडीने उपाययोजना करणे गरजेचे असूनही महापालिका ढिम्म बसून होती. जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी महापौर अख्तर शेख, आयुक्त सुधाकर तेलंग यांना शहरात मोहीम हाती घेण्याविषयीची सूचना केली. वारंवार तगादा लावून काही तरी कामे करा, असा दट्ट्या सुरू असल्यामुळे अखेर लातूर महापालिकेच्या मालकीच्या ग्रीनबेल्टमध्ये उताराला खड्डे खोदले. त्या खड्ड्यांमध्ये दगड, गोटे, वाळूचा भरडा असे साहित्य टाकले तर पावसाचे पाणी त्याद्वारे जमिनीत मुरेल, अशी योजना होती. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह यांच्या हस्ते या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला होता. मात्र, कोणी कितीही चांगली योजना आणली तरी तिचा कसा बट्ट्याबोळ करायचा याचा अनुभव गाठीशी असलेल्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी या खड्ड्यांमध्ये चक्क कचरा ओतायला सुरुवात केली आहे. जलपुनर्भरणासाठी खोदलेल्या खड्ड्यांत कचरा ओतण्याचे काम सुरू असल्यामुळे त्यात पावसाचे पाणी साचून दूषित पाणी जमिनीत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे अगोदरच पाणी नाही अशी स्थिती असताना आहे ते पाणी दूषित करण्याचे काम महापालिकेकडून केले जात आहे.
बेजबाबदारपणा अन् असंवेदनशीलता
लातूर महापालिकेने मोठा गाजावाजा करून पुनर्भरणाचा उपक्रम सुरू केला होता. मात्र, त्यात आवश्यक ते साहित्य टाकण्याऐवजी कुठल्या तरी बांधकामावर साइट स्वच्छ करताना उचलेली माती, रिकामी सिमेंटची पोती ट्रॅक्टरमध्ये भरून पुनर्भरणाच्या खड्ड्यांत आणून ओतली जात आहेत. त्यामुळे या अगोदर भरलेल्या खड्ड्यांत नक्की काय आहे हे तपासावे लागले. कदाचित या खड्ड्यांमध्ये दगड, गोटे, भरडा असे साहित्य भरले असल्याचे कागदोपत्री दाखवून त्याचे बिलही उचलले जाईल. इतर ठिकाणच्या खड्ड्यांमध्ये खाली कचरायुक्त माती आणि वरचा थर भरडा वाळूचा नसेल कशावरून? हा सगळा अत्यंत बेजबाबदरपणा असून असंवेदनशीलतेचे उदाहरण आहे.
अमोल गोवंडे, पुनर्भरणासाठी पुढाकार घेणार कार्यकर्ते