आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणीपुरवठ्याचे घोंगडे पुन्हा मनपाच्या गळ्यात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - महिन्याला ५० लाखांचा तोटा सहन करीत लातूर शहराला पाणीपुरवठा करणार्‍या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने अखेर या जबाबदारीतून मुक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेने ही योजना तातडीने ताब्यात घ्यावी, असे पत्रच जीवन प्राधिकरणाने महापालिका आयुक्तांना दिले आहे. एकीकडे धरणात पाणी नसताना ऐन टंचाईच्या काळात पाणीपुरवठ्याचे घोंगडे महापालिकेच्या गळ्यात पडल्यामुळे चारच दिवसांपूर्वी महापौर-उपमहापौरपदांचा कार्यभार हातात घेतलेल्या नूतन पदाधिकार्‍यांची जबाबदारी आणखी वाढली आहे.

लातूर शहराच्या पाणीपुरवठ्याची योजना महापालिकेने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला चालवायला दिली होती. महिन्याला ८० लाखांचा खर्च या योजनेवर होतो. मात्र, केवळ ३० लाखच वसुली असल्यामुळे मजिप्राला महिन्याला ५० लाखांचा तोटा होत होता. गेली दोन वर्षे सातत्याने हा तोटा भरून काढण्याचा प्रयत्न झाला. मात्र, वसुलीच नसल्यामुळे अखेर दोन दिवसांपूर्वी जीवन प्राधिकरणाने पाणीपुरवठ्याचे काम यापुढे करणे शक्य नसल्याचे कळवले आहे. पत्र मिळाल्याबरोबर ही योजना हस्तांतरित करून घ्यावी, असे सुचवले आहे. दरम्यान, लातूरला पाणीपुरवठा केल्या जाणार्‍या मांजरा साठ्यातील पाणी फक्त एप्रिल अखेरपर्यंतच पुरणार आहे. दुसरीकडे भंडारवाडी मध्यम प्रकल्पातून तातडीच्या पाणीपुरवठा योजनेसाठी ३० कोटी रुपयांची नवी योजना मंजूर झाली आहे. मात्र, चार वेळा निविदा काढूनही त्याला कंत्राटदारांनी प्रतिसाद दिलेला नाही. परिणामी सहा महिन्यांत पूर्ण होणे अपेक्षित असलेल्या या योजनेतील दोन महिने कंत्राटदारांचीच वाट पाहण्यात निघून गेले आहेत. दरम्यान, आयुक्त सुधाकर तेलंग आणि महापौर अख्तर मिस्त्री यांनी लातूरला पाणी कमी पडणार नाही, यासाठी तातडीने मीटरची सक्ती करणार असल्याचे सांगितले.
पर्यायी पाण्यासाठी लांबोटीची चाचपणी
लातूरला नजीकचा स्रोत उपलब्ध नसल्यामुळे नांदेड-लातूरच्या सीमेवर असलेल्या लांबोटी प्रकल्पातील पाणी लातूरला आणण्याची योजना होती. माळेगावनजीकच्या लांबोटी प्रकल्पाची १०७ दशलक्ष घनमीटर क्षमता आहे. सध्या तेथे २७ दशलक्ष घनमीटर पाणी आहे. तेथून पाणी आणता येणे शक्य आहे का, याची चाचपणी करण्यासाठी सोमवारी लातूर महापालिकेच्या नूतन पदाधिकारी, नगरसेवक, आयुक्तांनी लांबोटी प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली. लातूरचे आमदार अमित देशमुखही या वेळी उपस्थित होते. महापालिकेने मुंबईतील एका खासगी एजन्सीला याचा प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम दिले आहे. त्यानुसार काम सुरू झाले आहे. मात्र, समुद्रसपाटीपासून धरणाची उंची ४३० मीटर आहे, तर लातूर शहराची उंची ६३० मीटर इतकी आहे. सुमारे २०० मीटर उंचावर पाणी नेण्यासाठी दोन ते तीन ठिकाणी उपसा पंप बसवावे लागणार आहेत.