आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लातूर - जिल्हा परिषदेनंतर आता महापालिकेची रणधुमाळी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर  - जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची निवडणूक संपताच लातूर महापालिकेच्या दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे. महापालिका स्तरावरील  निवडणुकीबाबतची कार्यवाही पूर्ण होत आली अाहे. जि. प. आणि महापालिकांचे निकाल लागले की आयोग आठवडाभरात याबाबतचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. 
 
लातूर महापालिकेची २०१२ मध्ये पहिली पंचवार्षिक निवडणूक झाली होती. पाच वर्षांनंतर आता एप्रिलमध्ये या महापालिकेची मुदत संपणार आहे. त्यामुळे नव्याने निवडणुका होणार असून त्याची प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे. नव्याने प्रभाग रचना झाली असून त्याचे प्रकटीकरण करण्यात आले आहे.
 
 त्याच्यावर हरकती आणि आक्षेप घेण्याची मुभा देण्यात आली होती. त्यावर केवळ तीन आक्षेप घेण्यात आले होते. त्यातील एक आक्षेप मंजूर करून त्यानुसार प्रभागांची रचना झाली आहे. पहिल्या निवडणुकीत एका प्रभागात दोन नगरसेवक निवडून द्यायचे होते. आता होऊ घातलेल्या निवडणुकीत नव्याने झालेल्या बदलानुसार एका प्रभागातून चार नगरसेवक निवडून द्यावयाचे आहेत.  
 
अशी बदलली राजकीय समीकरणे : गेल्या पाच वर्षांत केंद्र-राज्यासह लातूरची स्थानिक राजकीय समीकरणेही पूर्णपणे बदलली आहेत. त्या वेळी काँग्रेसची केंद्र आणि राज्यात सत्ता होती. विलासराव देशमुख तेंव्हा केंद्रात मंत्री होते. पृथ्वीराज चव्हाण यांच्या मुख्यमंत्रिपदाचा तो काळ होता.
 
 मात्र मधल्या पाच वर्षांच्या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. विलासराव देशमुख यांचे निधन, दिलीपराव देशमुख यांचे सक्रिय राजकारणापासून दूर जाणे आणि आमदार अमित देशमुखांचा संपर्क कमी होणे या तीनही बाबी काँग्रेसला त्रासदायक ठरणार आहेत. त्याचबरोबर केंद्र आणि राज्यात भाजपची सत्ता आली आहे. 
 
भाजपने जिल्हा परिषदेच्या निवडणुका गांभीर्याने घेत काँग्रेसला चांगलीच टक्कर दिली होती. त्याच धर्तीवर महापालिकेच्या निवडणुकीसाठीही भाजपची तयारी पूर्ण झाली आहे. भाजपने माजी महापौर अख्तर मिस्त्री यांच्यासह अनेकांना पक्षात घेतले आहे. त्याचबरोबर पालकमंत्री संभाजी निलंगेकर यांच्यावर महापालिका निवडणुकांची जबाबदारी देण्यात आली आहे. भोपळा फोडतानाच ही महापालिका ताब्यात घेण्याचे भाजपचे प्रयत्न असणार आहेत.
 
महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी  
लातूर महापालिकेच्या आगामी महापौरपदासाठीची आरक्षण प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. हे महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी सुटले आहे. त्यामुळे यावर्षी खुल्या प्रवर्गातील इच्छुक उमेदवारांची संख्या जास्त राहण्याची शक्यता आहे.  
 
पहिल्याच निवडणुकीत मनपावर काँग्रेसचा झेंडा
पहिल्याच निवडणुकीत महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकला होता. त्यामध्ये काँग्रेसने ७० पैकी ४९ जागा पटकावून स्पष्ट बहुमत मिळवले होते. गेल्या पाच वर्षांत काँग्रेसचे तीन महापौर झाले. त्यातील एकाला जातीचा दाखला बनावट निघाल्यामुळे मुदतीच्या अगोरदच राजीनामा द्यावा लागला होता.  
 
भाजपचा भोपळा  गेल्या वेळेसच्या निवडणुकीत काँग्रेसला अर्धशतक गाठता आले नसल्याचे शल्य बोचत होते. तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाला भोपळाही फोडता आला नव्हता. राष्ट्रवादीचे १३ आणि शिवसेनेचे ६ नगरसेवक निवडून आले होते. मात्र राष्ट्रीय पक्ष असा दर्जा असलेल्या भाजपला एकही जागा जिंकता आली नव्हती.  
बातम्या आणखी आहेत...