आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लातूरमध्ये विलासरावांची सहानुभूती की मोदी लाट ?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर - माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर ही पहिलीच लोकसभा निवडणूक. काँग्रेसने ‘प्रायमरीज’मधून निवडलेले उमेदवार दत्तात्रय बनसोडे यांची भाजपच्या सुनील गायकवाड यांच्याशी लातूर मतदारसंघात थेट लढत होत आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत येथे विलासरावांच्या पश्चात निर्माण झालेली सहानुभूती काँग्रेसला तारणार की मोदी लाटेमुळे भाजपला फायदा होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आम आदमी पार्टीचे दीपरत्न निलंगेकर आणि बसपचे दीपक कांबळे यांचा या निवडणुकीतील सहभाग मते खाण्यापुरताच असेल.

राखीव असलेल्या लातूर लोकसभा मतदारसंघातून कोण-कोण उमेदवार राहणार याची चर्चा खरे तर सहा महिन्यांपूर्वीच सुरू झाली होती. काँग्रेसकडून ख्यातनाम अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव, मावळते खासदार जयवंत आवळे व जिल्हा परिषद अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे यांची नावे चर्चेत आली. त्यातील बनसोडे यांचे नाव ‘प्रायमरीज’मधून पुढे आले. भाजपमधील स्पर्धा तर अगदीच टोकाला गेली. अर्ज दाखल करण्यासाठी तीन दिवस बाकी असताना गतवेळचेच उमेदवार गायकवाड यांचे नाव जाहीर झाले. मात्र, त्यांच्यापुढे गटातटातील नाराजी आणि उदगीरचे आमदार सुधाकर भालेराव यांच्या बंडखोरीचा मुद्दा असणार आहे.

दुसरीकडे आमदार अमित देशमुख यांनी दत्तात्रय बनसोडे यांच्यासाठी पूर्ण ताकद पणाला लावली आहे. विलासरावांच्या पश्चात जिल्ह्यात आपलं नेतृत्व सिद्ध करण्याची ही त्यांच्यासाठी संधी आहे. त्यामुळे देशमुख यांनी ही प्रचाराची यंत्रणा पूर्णपणे आपल्या हातात घेतली आहे. खुद्द उमेदवार बनसोडे यांचा निवडणुकीतील सहभाग केवळ हात जोडून मते मागण्यापुरताच आहे. नेमक्या याच गोष्टीला आक्षेप घेत ‘प्रायमरीज’मध्ये पराभूत झालेले माजी नगराध्यक्ष मोहन माने यांनी आरोपांची राळ उडवली आहे. अमित देशमुख यांनी आपल्या ऐकण्यात असलेल्या बनसोडे यांच्यासाठी लॉबिंग केल्याचा माने यांचा आरोप आहे. मात्र, त्याची फारशी दखल पक्षांतर्गत पातळीवर घेण्यात आली नाही.

स्टार प्रचारकांची उणीव
गेल्या वेळी कॉँग्रेसने जयवंत आवळे या जिल्ह्याबाहेरील नेत्याला उमेदवारी दिली होती. मात्र, विलासरावांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून लातूरकरांनी त्यांना निवडून दिले. असे असले तरी भाजपचे उमेदवार डॉ. सुनील गायकवाड यांनी चांगलीच लढत दिली होती. गायकवाड केवळ आठ हजार मतांनी पराभूत झाले होते. यंदा कॉँग्रेसकडे विलासरावसारख्या दिग्गज नेत्याचा अभाव असून गायकवाड यांना मोदी लाटेचा फायदा होऊ शकतो.

आप’चे बळ तोकडे
आम आदमी पार्टीने दीपरत्न निलंगेकर या तरुण पत्रकाराला मैदानात उतरवले आहे. मात्र, आर्थिक पाठबळ नसल्यामुळे निलंगेकर यांना मतदारांपर्यंत पोहोचणेही अवघड आहे. प्रचारासाठीची मजबूत यंत्रणा नसल्यामुळे त्यांचा प्रयत्न तोकडा पडतो आहे, तर बसपाच्या तिकिटावर उभे ठाकलेले दीपक कांबळे यांचीही तीच गत आहे. माजी खासदार अरविंद कांबळे यांचे पुत्र असलेले दीपक उदगीर भागातून काही मते मिळवतील. मतदारसंघाच्या इतर भागांत त्यांना केवळ बसपाच्या हत्ती चिन्हावर मते मिळाली तेवढ्यावरच समाधान मानावे लागणार आहे.
आमदार भालेराव बंडखोरीच्या तयारीत
उदगीरचे भाजप आमदार सुधाकर भालेराव यांनी उमेदवारी मिळाली नसल्यामुळे बंडाचा झेंडा फडकवला आहे. मातंग शक्ती या संघटनेच्या माध्यमातून अपक्ष किंवा मिळालीच तर मनसेच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याची तयारी भालेराव यांनी केली आहे. मात्र, त्यांचा अद्याप निर्णय झालेला नाही. ते उभे ठाकले तर भाजपच्या सुनील गायकवाड यांच्यासमोरील अडचणी वाढणार आहेत.

दत्तात्रय बनसोडे यांची बलस्थाने
जि.प.च्या माध्यमातून जिल्हाभरात नाव. प्रशासनाचा अनुभव, उच्चशिक्षित, मनमिळाऊ, सर्वांसोबत चांगले संबंध, स्वच्छ प्रतिमा.
उणिवा : ऐंशी वर्षे वय, काँग्रेसविरोधातील जनमताचा फटका बसू शकतो. अमित देशमुखांबद्दलची नाराजी भोवू शकते.

सुनील गायकवाड यांची बलस्थाने
तरुण, उच्च्शिक्षित उमेदवार, नरेंद्र मोदी
फॅक्टरचा फायदा.
उणिवा : पक्षांतर्गत गटबाजी, कार्यकर्त्यांसोबत थेट संपर्क नाही. बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यामुळे प्रतिमा मलिन.