आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुग्णवाहकीने सात महिन्यांत वाचवले 73 हजार रुग्णांचे प्राण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - आपत्कालीन रुग्णांना अवघ्या एका कॉलवर सुरक्षितरीत्या रुग्णालयात पोहोचवण्याचे काम राज्य शासनाच्या भारत विकास ग्रुपद्वारा कार्यान्वित रुग्णवाहिका करीत आहेत. सात महिन्यांत 73 हजार 191 नागरिकांना या सेवेचा लाभ झाला असून ते मृत्यूच्या दाढेतून सुखरूप परत आले आहेत. कोणतेही शुल्क न आकारता पुरवण्यात येणारी ही सेवा शहरापासून वाड्या-वस्त्यांपर्यंत कौतुकाचा विषय ठरली आहे.

तणाव, बदलती जीवनेशैली यामुळे मानवी आरोग्य अनेकविध आजारांचे जणू आगारच झाले आहे. रस्त्यावरचे अपघात, हृदयविकार अन् अर्धांगवायूचे झटके या नित्याच्या घटना होऊ पाहत आहेत. वैद्यशास्त्र प्रगत व अद्ययावत होऊनही अत्यवस्थ रुग्णांना वेळेत सेवा मिळत नसल्याने मृत्यूदर वाढत होता. आपत्कालीन रुग्णांना पहिल्या तासाभरात अद्ययावत उपचार मिळाले तर त्याचे प्राण वाचू शकतात व विकलांगतेची तीव्रताही कमी होऊ शकते. जगात आयसीयू रुग्णवाहिका प्रथम अमेरिकेने सुरू केली. पुण्यातील नामांकित आपत्कालीन चिकित्सातज्ज्ञ डॉ. प्रसाद राजहंस यांनी ती भारतात आणली. आजघडीस 11 राज्यांत ती सुरू असल्याचे प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर शेळके व मराठवाडा विभागाचे विभागीय व्यवस्थापक डॉ. गजानन पुराणिक यांनी सांगितले.

काय आहे बीव्हीजी अ‍ॅम्ब्युलन्स
आपत्कालीन रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी 108 या टोल फ्री नंबरवर अवघ्या एका कॉलवर ही सेवा दिली जाते. निरोप मिळताच अर्ध्या तासाच्या आत अद्ययावत रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचते. अ‍ॅडव्हान्स लाइफ सपोर्ट व बेसिक लाइफ सपोर्ट अशा दोन प्रकारच्या रुग्णवाहिका आहेत. अ‍ॅडव्हान्समध्ये कार्डियाक मॉनिटर, बिफीब्रीलेटर, पेसमेकर, व्हेंटिलेटर, सिरिंज पंप, सक्शन ऑक्सिजन, इनफ्यूजन पंप, इमर्जन्सी डिलिवरी किट अशी आंतरराष्ट्रीय दर्जाची अद्ययावत उपकरणे आहेत. व्हेंटिलेटर व कार्डियाक मॉनिटरची सुविधा वगळता सर्व सुविधा बेसिक अ‍ॅम्ब्युलन्समध्ये आहेत. शिवाय जीपीएस, जीपीआरअस, एव्हीएलटीमुळे अ‍ॅम्ब्युलन्स कुठे आहे, कुठे जात आहे याचे थेट प्रक्षेपण पुणे येथील मुख्य केंद्रात होते. राज्यात 937 रुग्णवाहिका ही सेवा देत आहेत.

महाराष्‍ट्रातील जिल्हानिहाय लाभार्थी
औरंगाबाद 4436, जालना 956, बीड 2072, परभणी 909, हिंगोली 1152, नांदेड 2642, लातूर 2553, उस्मानाबाद 1380, नागपूर 3235, अकोला 1325, अमरावती 3085, भंडारा 715, बुलडाणा 1657, चंद्रपूर 751, वाशीम 778, धुळे 1427, गडचिरोली 304, गोंदिया 1284, नंदुरबार 817, वर्धा 493, यवतमाळ 2110, मुंबई 5786, ठाणे 2631, पुणे 4791, नाशिक 3978, अहमदनगर 3037, कोल्हापूर 4642, सोलापूर 4111, सांगली 2911, सातारा 2846, रायगड 812, रत्नागिरी 607, सिंधुदुर्ग 651.

गरजूंना लाभ
ही सेवा 26 जानेवारी 2014 पासून टप्प्याटप्प्याने महाराष्ट्रात कार्यान्वित करण्यात आली. 15 ऑगस्ट 2014 पर्यंत 73 हजार 191 गरजवंतांना त्याचा लाभ झाला. त्याचे वर्गीकरण रस्ता अपघात- 11151, हृदयविकार- 836, जोखमीची बाळंतपणे 19701, अर्धांगवायू , विषबाधा, सर्पदंश, 25687, अन्य 15716.

तीन हजार प्रशिक्षित डॉक्टर्स व चालक
या सेवेसाठी तीन हजार डॉक्टरांना व आपत्कालीन वैद्यकीय सेवेचे प्रशिक्षण देण्यात आले असून अडीच हजार डॉक्टर्स कार्यरत आहेत. विशेष म्हणजे चालकांनाही प्रशिक्षण देण्यात आले आहे.
डॉ. गजानन पुराणिक, बीव्हीजी, पुणे

मोलाची भूमिका
या सुविधेमुळे हजारो नागरिकांचे प्राण वाचत आहेत. विविध प्रकारच्या झटक्यांनी येणारी विकलांगता व जाणारे प्राण थोपण्यास ती मोलाची भूमिका बजावत आहे. रुग्णवाहिकेऐवजी तिला जीवदायिनी म्हणणे अधिक संयुक्तिक ठरेल.
हनुमंतराव गायकवाड, सीएमडी, बीव्हीजी इंडिया