आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latur News In Marathi, Divya Marathi, Police Recruitment

पोलिस भरतीकडे तरुणांची पाठ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - लातूर जिल्हा पोलिस दलाच्या वतीने 6 जूनपासून बाभळगाव येथील मुख्यालयाच्या मैदानावर 113 जागांसाठी पोलिस भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. पहिल्या दोन दिवसांत 800 पैकी 302 उमेदवार गैरहजर राहिल्याने खाकी वर्दीकडे तरुणांचा निरुत्साह दिसत आहे, परंतु शुक्रवारपासून राज्याच्या अन्य जिल्ह्यांतही एकाच वेळी भरती प्रक्रिया सुरू झाल्याने गळतीचा परिणाम जाणवत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

येथील 113 जागांसाठी तीन हजार 900 तरुणांनी अर्ज केले असून दररोज 400 तरुणांना बोलावण्यात येत आहे. त्यानुसार 6 जून रोजी 400 पैकी 295 उमेदवार हजर राहिले, तर दुसर्‍या दिवशी 7 जून रोजी 400 पैकी 197 तरुण अनुपस्थित राहिले. उंची, छाती मोजण्याबरोबरच प्रवेश अर्ज घेणे कागदपत्रांच्या झेरॉक्स व मूळ प्रती, सोबत दोन फोटो घेतले जात आहेत. अर्जाची तत्काळ छाननी करण्यात येत आहे. ही प्रक्रिया 15 जूनपर्यंत चालणार आहे. त्यानंतर 17 जूनपासून या उमेदवारांना मैदानी चाचणीसाठी बोलावण्यात येणार आहे. मैदानी चाचणीत उत्तीर्ण झाल्यानंतर लेखी परीक्षा होणार आहे.

भरतीसाठी बोलावण्यात आलेल्या तरुणांची नावे पोलिस विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहेत. तसेच त्यांना प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात आले असून मोबाइलद्वारे मेसेजही पाठवण्यात आले आहेत. भरतीसाठी येणार्‍या तरुणांची गैरसोय होऊ नये म्हणून सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. पोलिस अधीक्षक बी. जी. गायकर सर्व यंत्रणेवर देखरेख ठेवून आहेत.

भरती प्रक्रिया पारदर्शकपणे सुरू आहे. महत्त्वाच्या ठिकाणी व्हिडिओग्राफी करण्यात येत असून मैदानावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. एखाद्याने वशिलेबाजी करण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्यावर कारवाई केली जाणार आहे. शिवाय यासंदर्भात काही तक्रार असल्यास ती पोलिस अधीक्षक किंवा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तत्काळ नोंदवण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

आणखी एक संधी
46 व 7 जून रोजी ज्या तरुणांना भरतीसाठी उपस्थित राहता आले नाही, त्यांना आणखी संधी देण्यात येणार आहे. तांत्रिक अडचणीमुळे प्रवेशपत्र मिळाले नसतील, असे गृहीत धरून 15 जून रोजी सकाळी 5 वाजता या तरुणांना पुन्हा बोलावले जाणार आहे. त्यांच्या कागदपत्रांची तपासणी करून छाती, उंची मोजली जाणार आहे. बी. जी. गायकर, पोलिस अधीक्षक, लातूर