आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latur News In Marathi, Maharashtra Assembly Election 2014, Divya Marathi

लातूर जिल्ह्यातील सहाही मतदारसंघांत रंगतदार लढती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - विधानसभा निवडणुकीत या वेळेस लातूर जिल्ह्यातील सहाही मतदारसंघांत चुरशीच्या लढती पाहायला मिळणार आहेत. लातूर शहर आणि लातूर ग्रामीण या मतदारसंघातही उमेदवारांचा घाम निघणार आहे. एवढेच नव्हे, तर ग्रामीणचा बालेकिल्ला ढासळतो की काय अशी स्थिती आहे. निलंगा, अहमदपूरमध्येही हीच स्थिती आहे. औसा, उदगीरमध्ये स्थानिक संदर्भ वेगळे असून त्याचा आघाडीला फायदा होण्याची चिन्हे आहेत.

लातूर शहर, लातूर ग्रामीण, औसा, निलंगा, उदगीर आणि अहमदमपूर हे सहा मतदारसंघ आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सर्वच ठिकाणाहून भाजपला आघाडी मिळाली. लातूर शहर आणि ग्रामीण या देशमुखांचा गड असलेल्या मतदारसंघातूनही भाजपने मिळवलेली आघाडी धक्कादायक होती. त्यामुळेच काँग्रेसने विधानसभेचा ताक फुंकून पिण्यास प्रारंभ केला आहे. राज्यमंत्री अमित देशमुखांचा मतदारसंघ असलेल्या लातूरमध्ये विलासरावांच्या पश्चात अनेक विरोधकांनी उचल खाल्ली. त्यामुळे इच्छुकांच्या यादीत दिवसागणिक भर पडते आहे. काँग्रेस अंतर्गत राजकारणामुळेही विद्यमान आमदार वैजनाथ शिंदे यांचा पत्ता कट होण्याच्या मार्गावर आहे. तेथून देशमुख घरातीलच एखाद्याने निवडणूक लढवली तर आणि तरच ही जागा राखता येऊ शकते असा अहवाल पक्षश्रेष्ठींकडे गेला आहे.
निलंग्यामध्ये विद्यमान आमदार शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या विरोधात पुन्हा एकदा त्यांचे नातू संभाजी पाटील भाजपकडून लढणार आहेत. तेथे राष्ट्रवादीचे लिंबन महाराज रेशमे चर्चेत असून त्यांची अपक्ष थांबण्याची इच्छा आहे. अहमदपूरमध्ये अपक्ष म्हणून िनवडून आलेले आणि सध्या राष्ट्रवादीत
असलेले बाबासाहेब पाटील पुन्हा मैदानात उतरणार आहेत. उदगीर या राखीव मतदारसंघात सध्या भाजपचे सुधाकर भालेराव आमदार आहेत. मात्र त्यांच्या विरोधात लोकांमध्ये नाराजी आहे.
काँग्रेससाठी अच्छे दिन
औसा मतदारसंघात काँग्रेससाठी अच्छे दिन आहेत. तेथील बसवराज पाटील या काँग्रेसच्या आमदारांबद्दल फारशी नाराजी नाही. त्यांनी केलेली विकासकामे नजरेत भरणारी आहेत. तसेच लिंगायतांची जास्तीची संख्या ही त्यांच्या विजयासाठी फायदेशीर आहे. शिवसेनेचे दिनकर माने चौथ्यांदात रिंगणात आहेत. त्यांनी आपल्या दोन टर्ममध्ये काही कामे केली नसल्याचे सांगण्यात येते. मात्र, मराठा समाजाच्या मतदानावर ते नशीब आजमावत आहेत.