आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पॅलेस्टाइनवरील हल्ल्याच्या निषेधार्थ लातूरकर रस्त्यावर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर- पॅलेस्टाइनवरील इस्रायलच्या अमानवी हल्ल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी लातूर शहरातील सर्वपक्षीय कार्यकर्ते, संघटना व नागरिकांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर शांतता रॅली काढण्यात आली. क्रूरतेचा कळस गाठून निरपराध नागरिक अन् निरागस बालकांच्या जिवाशी खेळणार्‍या इस्रायलला दहशतवादी राष्ट्र घोषित करून इस्रायलप्रणीत बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या व्यापारास भारतीय बाजारपेठेत बंदी आणावी, अशी एकमुखी मागणी त्यांनी केली. मागण्यांचे निवेदन केंद्र सरकारला सादर करण्यासाठी जिल्हाधिकाना देण्यात आले.

गंजगोलाईजवळील आझमगंज मशीद रोड येथून दुपारी तीन वाजता ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मार्गस्थ झाली. हजारो नागरिक व मुले त्यात सहभागी झाली होती. मूक रॅली असली तरी नागरिकांनी हाती धरलेल्या फलकांवरील छायाचित्रे व मजकुरावरून इस्रायलची क्रूरता, मुस्लिम राष्ट्र अन् संयुक्त राष्ट्राने बाळगलेले मौन, अमेरिकेची खेळी याबाबत लातूरकरांची खदखद ठळकपणे व्यक्त होत होती. संयुक्त राष्ट्रसंघाने हस्तक्षेप करून पॅलेस्टाइनवरील हल्ले तत्काळ थांबवावेत, भारताने युनोकडे इस्रायलविरुद्ध सैनिकी कारवाईची मागणी करावी, भारत-पॅलेस्टाइन संबंध दृढ करावेत, अशा मागण्या या वेळी करण्यात आल्या.