आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालातूर - आयुष्य घडवण्याचा पहिला टप्पा असलेल्या दहावी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी वडिलांचे निधन झाले असता दु:ख बाजूला सारून विद्यार्थ्याने परीक्षा दिली. त्याला परीक्षा केंद्रप्रमुख आणि शिक्षण मंडळातील अधिका-यांनीही बळ दिल्याने त्याचे प्रयत्न सार्थकी लागले.
लातुरात राहणारा कृष्णा वसंत राठोड हा दहावीत शिकतो. त्याची सोमवारपासून परीक्षा होती. तो त्याच्या तयारीत असतानाच पहाटे त्याचे वडील वसंत यांचे निधन झाले. त्यामुळे तो दु:खात बुडाला. खचून गेल्याने परीक्षा द्यायची की नाही, अशी त्याची मन:स्थिती झाली. खचलेल्या मनाने त्याने आपल्या वडिलांना अखेरचा निरोप दिला. तोपर्यंत अकरा वाजले होते. नातेवाइकांनी त्याला धीर देत परीक्षा देण्यासाठी तयार केले. त्यानंतर तो साडेअकराच्या सुमारास परीक्षा केंद्र असलेल्या ज्ञानेश्वर विद्यालयात आला. केंद्रप्रमुखांना हकिकत सांगितली. परीक्षा केंद्रात येण्यासाठी उशीर झाल्याने केंद्र प्रमुखांनी लातूर मंडळाचे सचिव एस.एन. जगताप यांच्या कानावर ही बाब घातली. त्यानंतर मंडळाकडून त्याचे सांत्वन करत त्याला चहा-बिस्कीट देण्यात आले आणि परीक्षेला बसण्याची परवानगी देण्यात आली. प्रश्नपत्रिका दिल्यानंतर त्याला संपूर्ण तीन तास वेळ देण्यात येऊन त्याचे वाया जाणारे वर्ष वाचवण्यात आले.
आजारी विद्यार्थ्याला जवळचे केंद्र : लातूरच्या परिमल विद्यालयात दहावीत शिकणा-या शशांक शंकर धोंडगे या आजारी विद्यार्थ्याचे परीक्षा केंद्र ऐनवेळी बदलून मंडळाने औदार्य दाखवले. शशांकवर काही दिवसांपूर्वी अपेंडिक्स आजारावरील शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्याला डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे, पण सोमवारपासून त्याची परीक्षा सुरू झाली. त्याचे केंद्र घरापासून दूर देशीकेंद्र विद्यालयात होते. त्याने आपले आजारपण मंडळाला कळवले. त्यानंतर मंडळाने त्याला घराजवळच परिमल विद्यालयात परीक्षा देण्याची सोय
करून दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.