Home »Maharashtra »Marathwada »Other Marathwada» Latur Parbhani And Chandrapur Municipal Corporation Result Live

'देशमुख गढी' ढासळली, लातूर महापालिकेत भाजप झीरोवरून हीरो; परभणीत काँग्रेस काठावर

दिव्य मराठी वेब टीम | Apr 22, 2017, 10:21 AM IST

लातूर/परभणी/चंद्रपूर- संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या लातूर महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारत सत्ताधारी काँग्रेसला धूळ चारली. लातुरात स्पष्ट बहुमत मिळवत भाजपने मनपाच्या चाव्या आपल्या खिशात ठेवल्या. परभणीत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेससह शिवसेनेला जोरदार धक्का देत काँग्रेसने काठावर पोहोचण्याचा प्रयत्न केला. सत्ता स्थापण्यासाठी काँग्रेसला २ सदस्यांच्या कुबड्यांची गरज आहे.
लातूर आणि परभणी महापालिकेसाठी अत्यंत चुरशीची लढत झाली. लातुरात दुपारी साडेतीन वाजता भाजपने बहुमतासाठी आवश्यक असलेला ३६ चा आकडा गाठल्याचे जाहीर करण्यात आले. काँग्रेसला ३३ जागांवर समाधान मानावे लागले, तर राष्ट्रवादीला केवळ १ जागा मिळाली. परभणीत काँग्रेसने विजयाची घोडदौड कायम राखताना बहुमताचा ३३ चा जादुई आकडा गाठण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात काँग्रेसला ३१ जागांवर बहुमताच्या काठावर थांबण्याची वेळ आली. त्यामुळे सत्ता स्थापण्यासाठी येथे दोन सदस्यांच्या कुबड्यांची गरज काँग्रेसला लागणार आहे. मराठवाड्यातील महत्त्वाची लातूर मनपा भाजपकडे गेल्याने राजकीय समीकरणेच बदलण्याची चिन्हे दिसत आहेत.
लातूर महापालिकेसाठी काँग्रेस आणि भाजपमध्ये अत्यंत चुरशीची लढत झाली. मतमोजणी सुरू झाल्यापासूनच कधी भाजप पुढे, तर कधी काँग्रेस असा पाठशिवणीचा खेळ सुरू होता. तो अखेरपर्यंत सुरूच राहिला. शेवटी दुपारी साडेतीन वाजता भाजपने बहुमतासाठी आवश्यक असलेला ३६ चा आकडा गाठल्याचे जाहीर करण्यात आले. काँग्रेसला ३३ जागांवर समाधान मानावे लागले, तर राष्ट्रवादीला केवळ १ जागा मिळाली. यापूर्वीच्या महापालिकेत एकही जागा नसलेल्या भाजपने काठावर का होईना बहुमत मिळवत लातूर महापालिकेतली देशमुखांची सत्ता खालसा केली.
लातूर जिल्हा परिषदेमध्ये भाजपने संभाजी पाटील निलंगेकरांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची २५ वर्षांची सत्ता उलथवली होती. त्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या लातूर महापालिकेतही याचीच पुनरावृत्ती करण्याचा विडा संभाजी पाटील यांनी उचलला होता. त्यांनी काँग्रेस, शिवसेनेतून मोठ्या प्रमाणात उमेदवार आयात केले. दोन महिन्यांपासून भाजपत इनकमिंग सुरू होते.
दुसरीकडे आमदार अमित देशमुख यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसनेही जोरदार फील्डिंग लावली होती. या दोनच पक्षांत लढती होत असल्याचे पाहायला मिळाले. भाजपने रिपाइंला सोबत घेऊन निवडणूक लढली. रिपाइंला एकही जागा मिळू शकली नाही. मात्र भाजपने एकट्याच्या बळावर ३६ जागा मिळवत सत्ता खेचून आणली.
दुसरीकडे काँग्रेसने बदललेले वातावरण लक्षात घेऊन केवळ निवडून येतील अशा उमेदवारांनाच मैदानात उतरवले. चांगले नियोजन करून प्रचार यंत्रणा राबवली. परंतु गेल्या पाच वर्षांतील कामकाजावर नाराज असलेल्या लातूरकरांनी यंदा कारभारी बदलायचा ठरवला असल्यामुळे काँग्रेसला ३३ जागांवर समाधान मानावे लागले. त्यांना सत्तेसाठी आणखी ३ जागा मिळणे अावश्यक होते.

काँग्रेसच्या जागा खेचतानाच राष्ट्रवादीचीही दाणादाण
भाजपच्या एकाही कार्यकर्त्याला गेल्या निवडणुकीत विजय मिळाला नव्हता. त्यामुळे या निवडणुकीत झीरोपासून सुरुवात करून सत्ता मिळवण्याचे ध्येय भाजपने ठेवले होते. काँग्रेसच्या जागा खेचतानाच भाजपने राष्ट्रवादीचीही दाणादाण उडवली. गेल्या वेळी राष्ट्रवादीचे १३ नगरसेवक होते. त्यातील दोघांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र या वेळी उस्मानाबादहून नेमलेले जीवन गोरे हे प्रभारी होते. त्यांच्या नियोजनशून्यतेमुळे राष्ट्रवादीला केवळ एक जागा मिळाली. तीही केवळ ५ मतांच्या फरकाने. शिवसेनेचाही दारुण पराभव झाला.

लातूरमधील देशमुखांची पारंपरिक सत्तेची गढी निलंगेकरांकडून खालसा
यापूर्वीच्या महापालिकेत एकही जागा नसलेल्या भाजपने स्पष्ट बहुमत मिळवत लातूर महापालिकेतली देशमुखांची सत्ता खालसा केली. लातूर जिल्हा परिषदेमध्ये भाजपने संभाजी पाटील निलंगेकरांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची २५ वर्षांची सत्ता उलथवली होती. त्या पार्श्वभूमीवर लातूर मनपातही याचीच पुनरावृत्ती करण्याचा विडा संभाजी पाटील यांनी उचलला होता.

परभणीत मुस्लिम उमेदवार देऊनही भाजप-शिवसेनेचा विचका
परभणीत बहुतांश लढती तिरंगी वा चौरंगी झाल्या. प्रामुख्याने मुस्लिम प्राबल्याच्या प्रभागांत शिवसेना व भाजपने दिलेल्या मुस्लिम उमेदवारांना लक्षणीय अशी मते मिळवता आली नाहीत. त्यामुळे अशा प्रभागांत काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी अशीच लढत रंगली. याउलट हिंदू प्राबल्याच्या मतदारसंघातही काँग्रेसने मिळवलेले यश उल्लेखनीय आहे. या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे दोन्ही काँग्रेसच्या तिकिटांवर निवडून आलेल्या उमेदवारांत मुस्लिम उमेदवारांची संख्या खूपच मोठी आहे.

चंद्रपुरातही भाजप
नागपूर - चंद्रपूर मनपातही कमळ फुलले. एकूण ६६ जागांपैकी भाजपने ३७ जागा मिळवल्या. काँग्रेसला ११ तर शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी २ जागांवरच समाधान मानावे लागले. महापौरपद पुन्हा एकदा महिलेकडेच जाईल.
पुढील स्‍लाइडवर वाचा,
- परभणी महापालिकेत काँग्रेसचा विजयाचा वारू बहुमताच्या काठावर
- अपक्षांच्या कुबड्या घेत परभणीत काँग्रेसची सत्ता
- देशमुखांनी इशारा दिलेले पवार सहाव्यांदा जिंकले
- पराभूत काँग्रेस उमेदवाराने दिली तक्रार
- चंद्रपूर, लातूर, परभणी महापालिकांचा अंतिम निकाल

Next Article

Recommended