आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लातूर पॅटर्नची मोहिनी विद्यार्थ्यांसह पालकांवर अद्यापही कायम !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर - लातूर पॅटर्नची मोहिनी विद्यार्थी व पालकांवर कायम असून 11 वी विज्ञान शाखेच्या प्रवेशासाठी लातूरसह इतर जिल्ह्यांतीलही विद्यार्थ्यांनी लातुरात गर्दी केली आहे. राजर्षी शाहू व दयानंद या नामांकित महाविद्यालयांना अक्षरश: जत्रेचे रूप आले असून अहमदपूरच्या महात्मा गांधी महाविद्यालयातही यापेक्षा वेगळे चित्र नाही. विज्ञान शाखेखालोखाल वाणिज्य शाखेला विद्यार्थ्यांची पसंती असून कला शाखेची प्रवेश पूर्व नोंदणी पाहता सर्व वर्गांना विद्यार्थी मिळतील का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.


12 वीतील लातूर पॅटर्नचा विज्ञान शाखेचा निकाल नेहमीच उज्ज्वल राहिला असल्याने राज्यभरातील विद्यार्थी येथील महाविद्यालयांत प्रवेश घेण्यासाठी उत्सुक असतात. हे वर्षही त्यास अपवाद नसल्याचे प्रवेशपूर्व नोंदणीसाठी झालेल्या गर्दीवरून दिसत आहे. शाहू महाविद्यालयात 7 जूनपासून प्रवेश अर्ज विक्री व नोंदणीला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे रविवारीही ती सुरू होती. विज्ञान शाखेसाठी या महाविद्यालयांत 720 प्रवेश क्षमता असून सोमवारपर्यंत 3200 विद्यार्थ्यांनी नोंदणी केल्याचे प्राचार्य डॉ. संदिपान जाधव यांनी सांगितले. वाणिज्य शाखेसाठी 201 नोंदणी झाली असून 19 मे पर्यंत नोंदणीची मुदत आहे. दयानंद विज्ञान महाविद्यालयातही गर्दी लोटली असून दोन हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. या महाविद्यालयाची प्रवेश क्षमता एक हजार एकशे चाळीस असल्याचे उपप्राचार्य दासराव सूर्यवंशी यांनी सांगितले. या महाविद्यालयात वाणिज्य शाखेलाही प्रवेशासाठी झुंबड उडाली आहे. प्रवेश क्षमता 480 आहे. 1400 अर्ज विक्री झाली असून 700 विद्यार्थ्यांनी नोंदणी केल्याचे प्राचार्य डॉ. आत्माराम पळणीटकर यांनी सांगितले.


जिल्ह्याबाहेरून विद्यार्थी
विज्ञान शाखेत प्रवेश घेण्यासाठी परजिल्ह्यातूनही विद्यार्थी येत आहेत. उस्मानाबाद, नांदेड, बीड, परभणी, अमरावती, अकोला, बुलडाणा, सोलापूर, कोल्हापूर येथील हे विद्यार्थी आहेत.


कला शाखेच्या जागा रिक्तच !
कला शाखेला प्रवेश घेण्याकडे विद्यार्थ्यांचा ओढा कमी आहे. राजर्षी शाहू महाविद्यालयाची 11 वीची प्रवेश क्षमता 360 असून केवळ 47 अर्जांची विक्री झाली आहे. दयानंद महाविद्यालयात चार तुकड्या असून प्रवेश क्षमता 480 आहे. 100 अर्ज विकले गेले आहेत. कला शाखेसाठी सरळ प्रवेश देण्याची ऑफर देऊनही प्रवेशाकडे विद्यार्थ्यांचा कल नसल्याचे प्राचार्य डॉ. वामन पाटील म्हणाले.


सेतूत जत्रा
प्रवेशासाठी लागणारी शैक्षणिक प्रमाणपत्रे काढण्यासाठी विद्यार्थी व पालकांनी सेतू केंद्रात गर्दी केली आहे. त्यांना प्रमाणपत्र 24 तासांत मिळावेत यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. उत्पन्न, रहिवासी, राष्ट्रीयत्व, जात असे दररोज सुमारे 1900 प्रमाणपत्रे वितरित करण्यात येत असल्याचे प्रभारी तहसीलदार एस. यू. तांदळे यांनी सांगितले.