आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपेक्षा उंचावल्या: लाल दिव्यासाठी लातूरकरांच्या आशा पुन्हा पल्लवित

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर- काँग्रेसच्या सत्ताकाळात अखेरच्या तीन महिन्यांत लातूरला मंत्रिपद मिळाले. मात्र, सत्ताबदलानंतर दोन आमदार निवडून येऊनही भाजपने जिल्ह्याला लाल दिवा दिला नाही. मंत्रिपद हुकले असले तरी महामंडळांच्या अध्यक्षांच्या नियुक्त्या होण्याच्या हालचाली सुरू झाल्यामुळे लातूरकरांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत. लातूर जिल्ह्यातील निलंग्याचे आमदार संभाजी पाटील निलंगेकरांना पंचायत राज समितीचे अध्यक्षपद मिळण्याची शक्यता आहे.
लातूर जिल्हा हा कायमच राजकीयदृष्ट्या वजन राखून असलेला जिल्हा आहे. अगदी सुरुवातीला केशवराव सोनवणेंच्या रूपाने लातूरला राज्यात मंत्रिपद मिळालं होतं, तर टी. एस. शृंगारे यांच्या रूपानं केंद्रीय मंत्रिपद मिळालं. पुढे शिवाजीराव पाटील निलंगेकर, शिवराज पाटील चाकूरकर, विलासराव देशमुख यांच्या रूपानं सतत लातूरला लाल दिवा मिळत आला. त्यातही निलंगेकर आणि देशमुख यांनी राज्याचं मुख्यमंत्रिपदही सांभाळलं, तर चाकूरकरांनी विधानसभेचे सभापती, लोकसभेचे सभापती, गृहमंत्री आणि राज्यपाल म्हणून जवळपास पन्नास वर्षे लाल दिवा तेवत ठेवला. मात्र, विलासरावांच्या मृत्यूनंतर लातूरचा लाल दिवा हरवला. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे पुत्र अमित यांना राज्याच्या मंत्रिमंडळात समावेश होण्यासाठी अक्षरक्ष झगडावं लागलं. अखेर मुदत संपायला तीन महिने उरले असताना त्यांना राज्यमंत्रिपद देण्यात आलं. सात महिन्यांपूर्वी जेव्हा राज्यात सत्ताबदल झाला तेव्हा लातूरचं तेही मंत्रिपद गेलं. नव्यानं सत्तेत आलेल्या भाजपच्या संभाजी निलंगेकर आणि उदगीरचे आमदार सुधाकर भालेराव यांनी मंत्रिपदासाठी फिल्डिंग लावली. मात्र, त्यांची वर्णी लागू शकली नाही; परंतु संभाजी निलंगेकरांनी नितीन गडकरींच्या माध्यमातून मंत्रिमंडळ प्रवेशासाठी प्रयत्न सुरूच ठेवले आहेत. त्यातच सत्तेतला भागीदार शिवसेनेला मंत्रिपदे द्यावी लागल्यामुळे आता मंत्रिपद मिळणं अवघड असल्याचे पाहून निलंगेकरांनी महामंडळाच्या अध्यक्षपदासाठी लॉबिंग सुरू केलं. त्यातच वैधानिक अधिकार असलेली आणि जिल्हा परिषदांच्या कामाचे ऑडिट करणाऱ्या पंचायत राज समितीच्या अध्यक्षपदासाठी निलंगेकरांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे. या पदाला कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा आहे. त्यामुळे निलंगेकरांसाठी ही संधी मोलाची ठरणार आहे.

पक्षांतर्गत विरोध
सुधाकरभालेराव आणि संभाजी निलंगेकर या दोघांचाही मंत्रिमंडळ प्रवेश होऊ देण्याला भाजपतूनच जोरदार विरोध असल्याची माहिती आहे. प्रारंभी हे दोघेही गोपीनाथ मुंडे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जायचे. या दोघांनाही मुंडेंनीच भाजपत आणले आणि आमदार केले. पुढे हे दोन्ही आमदार नितीन गडकरींच्या गोटात गेले. त्यामुळे मुंडे समर्थकांचा या दोघांनाही विरोध आहे. त्यातही पंकजा मुंडे ग्रामविकासमंत्री आहेत. त्यांच्या खात्याचा थेट संबंध जिल्हा परिषद, पंचायत समित्यांशी येतो. त्यांच्याच कामांवर देखरेख ठेवणाऱ्या पंचायत राज समितीच्या अध्यक्षपदी निलंगेकरांची वर्णी लागली तर हा सत्तासंघर्ष आणखी तीव्र होणार आहे.
बातम्या आणखी आहेत...