लातूर - दररोज धावणारी मुंबई-लातूर रेल्वेगाडी लातूर स्थानकात दिवसभर थांबते. त्यामुळे प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेता ही गाडी दिवसा लातूर-पुणे चालवावी, अशी मागणी मराठवाडा जनता विकास परिषदेच्या लातूर शाखेतर्फे मुंबई येथील मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांकडे केली आहे.
येथील रेल्वेस्थानकातून दररोज धावणाऱ्या मुंबई-लातूर रेल्वेसेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद आहे; परंतु मुंबईहून ही गाडी सकाळी आल्यानंतर लातूर रेल्वेस्थानकात जवळपास १६ तास उभी असते. त्यामुळे दिवसभर उभी राहण्यापेक्षा ही गाडी लातूर-पुणे चालवण्याची मागणी अनेक वर्षांपासून करण्यात येत आहे. त्यासाठी मराठवाडा जनता विकास परिषद आणि रेल्वे प्रवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी रेल्वेमंत्री, रेल्वेचे वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन यापूर्वीही निवेदने दिल्याची माहिती परिषदेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी नरहरे यांनी दिली. दसरा, दिवाळी सणांनिमित्त प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन लवकरच सदरची गाडी सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे.