आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लातूरच्या पाणी योजनेचा पोरखेळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - लातूरवर पाणीसंकट येणार याचा अंदाज आल्यामुळे भंडारवाडी धरणातून 30 कोटी रुपये खर्चाची पर्यायी योजना तयार करण्यात आली. ती मंजूरही झाली. मात्र, उन्हाळ्यापर्यंत आम्ही ती पूर्ण करू शकणार नाही, असे सांगत एमजेपीने त्यातून माघार घेतली. आता पुन्हा एकदा तीच योजना आम्हाला द्या, अशी मागणी शुक्रवारी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली अन् क्षणभर तेही अवाक् झाले.

मांजरा धरणात पाणी नसल्यामुळे गेल्या वर्षी नोव्हेंबरपासूनच नियोजनाला सुरुवात झाली. जिल्हाधिकार्‍यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, महापालिका यांची बैठक घेऊन मांजरा धरण आटले, तर पर्यायी स्रोतांचा शोध घ्या, असे सांगितले होते. त्यावरून जीवन प्राधिकरणने डिसेंबर महिन्यात लातूरपासून 18 किलोमीटरवर असलेल्या भंडारवाडी मध्यम प्रकल्पातून नवीन पाइपलाइन टाकण्याचा प्रस्ताव सादर केला. 30 कोटी रुपयांची ही योजना होती. जिल्हाधिकार्‍यांमार्फत ती राज्य शासनाकडे गेली. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकार्‍यांसह आमदार अमित देशमुख यांनी ती मंजूर करण्यासाठी प्रयत्न केले. टंचाईमध्ये प्रत्येक जिल्ह्याला दोन कोटी रुपये दिले जातात, मग एकट्या लातूरला 30 कोटी कसे द्यायचे, असा प्रश्न त्या वेळी निर्माण झाला. मात्र, मुख्यमंत्र्यांनी विशेष बाब म्हणून योजनेला मंजुरी दिली. त्यावर काम सुरू झाले असते, तर जुलै-ऑगस्टपर्यंत लातूरकरांना पाणी मिळाले असते आणि एक कायमस्वरूपी पर्यायी योजना हाताशी राहिली असती, परंतु मंजुरी मिळाल्यानंतर हे काम मुदतीत पूर्ण होणार नाही, असा पवित्रा घेत जीवन प्राधिकरणने ही योजना रद्द करण्याची मागणी केली. ते पत्र जिल्हाधिकार्‍यांमार्फत शासनाकडे गेले आणि ती योजना रद्द झाली.

‘दिव्य मराठी’चा पाठपुरावा
सलग दुसरी योजना स्वत:च रद्द करवून घेण्याची नामुष्की प्रशासनावर ओढवली होती. ‘दिव्य मराठी’ने त्याबाबत 14 फेब्रुवारीच्या अंकात याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर अधिकार्‍यांनी आपल्याला चुकीची माहिती दिली. त्यामुळेच योजना मंजूर करून पुन्हा रद्द करावी लागल्याची खळबळजनक कबुली आमदार अमित देशमुख यांनी दिली होती. त्याचेही वृत्त ‘दिव्य मराठी’ने 15 फेब्रुवारीच्या अंकात प्रसिद्ध केले होते.

दुसरी योजनाही झाली होती रद्द
विशेष म्हणजे ही योजना रद्द केल्यानंतर एमजेपी आणि महापालिकेने दुसर्‍या एका नव्या योजनेचा प्रस्ताव पाठवला होता. कारसा-पोहरेगाव उच्च्स्तरीय बंधार्‍यावरून नवी वाहिनी टाकायची. ती सहा किमीवरील मांजराच्या सध्याच्या वाहिनीला जोडायची अशी ती योजना होती. सहा कोटींची ही योजना मंजूरही झाली. मात्र, काम सुरू करायच्या अगोदरच कारसा-पोहरेगावमधील पाणी संपून गेले. या प्रकल्पात पाणीच नव्हते, तर योजना प्रस्तावित का केली याचे उत्तर कोणाकडेच नव्हते.

पुन्हा त्याच योजनेच्या मागणीने मुख्यमंत्रीही अवाक्
शुक्रवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये मुख्यमंत्र्यांनी लातूरचा आढावा घेताना कायमस्वरूपी पर्यायी योजनेबाबत काय स्थिती आहे, अशी विचारणा केली. त्या वेळी जिल्हाधिकारी विपीन शर्मा यांनी पुन्हा एकदा भंडारवाडी प्रकल्पातून नव्याने जलवाहिनी टाकण्याची योजना पुढे केली. एमजेपीच्या अभियंत्यांनीही तीच योजना योग्य असल्याचे सांगितले. मागणी करून मंजूर करून घेतलेली आणि विनंती करून स्वत:च रद्द करवून घेतलेलीच योजना पुन्हा पुढे आल्यामुळे मुख्यमंत्रीही काही क्षण अवाक् झाले.