आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनोरुग्णांची दिवाळी येरवड्यात, लातूर-पुण्यातील तरुणांचा पुढाकार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर- रस्त्यावर बेवारस फिरणाऱ्या मनोरुग्णांना पुण्यातील येरवडा मनोरुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुण्यातील स्माइल प्लस सोशल फाउंडेशनच्या मदतीने लातूरमधील काही तरुणांनी पुढाकार घेऊन या मनोरुग्णांच्या आयुष्यात हे आनंदाचे क्षण फुलवले आहेत.

पुण्यातील स्माइल प्लस सोशल फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या योगेश मालखरे यांच्या संवेदनशील मनाला मनोरुग्णांची ही अवस्था पाहवली नाही. त्यांनी प्रारंभी २००५ मध्ये पुण्यातील रस्त्याच्या कडेला आयुष्याचा गाडा ढकलणाऱ्या मनोरुग्णांना येरवडा मनोरुग्णालयात दाखल केले. त्यानंतर राज्यभरात स्थानिक तरुणांशी संवाद साधून तिथल्या मनोरुग्णांना येरवडा मनोरुग्णालयात दाखल करण्याचा विडा उचलला. गेल्या वर्षभरात ९० च्या वर मनोरुग्णांना या संस्थेने पुण्याला नेले आहे. यावर्षी दिवाळीच्या तोंडावर लातूरमध्ये प्रवीण येळे, राहुल पाटील, मुस्तफा सय्यद, जाफर शेख, प्रशांत जेवळीकर अशा तरुणांच्या मदतीने इथल्या ५ मनोरुग्णांना पुण्याला नेण्यात आले आहे, तर एका वृद्धाला वृद्धाश्रमात दाखल
करण्यात आले आहे.

कोमल पूर्वी आणि आता
लातूरमधील कोमल नावाच्या एका मनोरुग्ण मुलीला दोन महिन्यांपूर्वी राहुल पाटील, प्रवीण येळे आणि त्यांच्या मित्रांनी येरवड्यातील मनोरुग्णालयात दाखल केले. तिच्यावर उपचार झाल्यानंतर तिचा नूरच पालटला आहे. सध्याचा तिचा फोटो पाहिला तर कधीकाळी ती अशी होती यावर विश्वासही बसणार नाही. तिचे बदललेले रूप पाहून या तरुणांनी नव्या प्रेरणेने आणि उत्साहाने इतर बेवारसांना निवारा, उपचार, पोटभर अन्न देण्याची मोहीम सुरू केली आहे.

मनोरुग्णांना मिळाला निवारा
गेल्या कित्येक वर्षांपासून लातूरच्या रस्त्यावर भटकणाऱ्या एका महिलेसह सहा मनोरुग्णांना तीन दिवसांपूर्वी पुण्याला नेले आहे. प्रारंभी त्यांना खायला-प्यायला देणे, त्यांच्याशी स्नेहपूर्ण व्यवहार करून त्यांची मने जिंकली जातात. ज्यांना वेडे म्हणून सगळे जण हिणवतात ते प्रत्यक्षात चांगला संवाद साधतात, असा या तरुणांचा अनुभव आहे. लातूरमध्येही बबलू, भाग्यश्री या दोघांनी संवाद साधला. त्यांना यंदाच्या दिवाळीत हक्काचा निवारा मिळाला आहे.
बातम्या आणखी आहेत...