आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लातूरच्या शिक्षणाधिका-यास मारहाण प्रकरणी अटक

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर - आपल्या वागणुकीमुळे सातत्याने वादग्रस्त ठरलेल्या जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी कैलास गोस्वामी यांना मंगळवारी पोलिसांनी अटक केली. केशकर्तनालयात जाऊन मद्यधुंद अवस्थेत नाभिकास गोस्वामी यांनी मारहाण केल्यामुळे ही अटक करण्यात आली. नाभिक समाज संघटनेने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.
जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी कैलास गोस्वामी 10 जानेवारी रोजी औसा रस्त्यावरील खर्डेकर स्टॉपजवळ असलेल्या वैभव जेंटस् पार्लरमध्ये रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास गेले. त्या वेळी दुकान मालक नागेश श्रीमंगले यांनी त्यांना दुकान बंद करायची वेळ झाली असल्याचे सांगितले, तरीही गोस्वामी यांनी आग्रह केल्यामुळे श्रीमंगले यांनी काम करण्याची तयारी दाखवली. त्या वेळी गोस्वामी यांनी श्रीमंगले यांना अश्लील वर्तन करण्याचा आग्रह केला. त्याला नकार दिल्यानंतर मद्यधुंद अवस्थेत असलेल्या गोस्वामी यांनी श्रीमंगले यांना जबर मारहाण केली. त्यांनाच दुकानाबाहेर काढून दुकानाचे शटर बंद केले. भेदरलेल्या श्रीमंगले यांनी याची माहिती दुस-या दिवशी नाभिक समाज संघटनेच्या अध्यक्षांना दिली. त्यानंतर 13 जानेवारी रोजी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली. मात्र, गुन्हा नोंद झाला नाही आणि त्यांना अटकही झाली नाही. त्यामुळे नाभिक समाज संघटनेने जिल्हाधिकारी विपिन शर्मा आणि मुख्य कार्यकारी अधिकारी एस. पी. सिंह यांना सोमवारी निवेदन दिले. जिल्हाधिका-यांपर्यंत प्रकरण पोहोचल्यामुळे शिवाजीनगर पोलिसांनी गोस्वामी यांना मंगळवारी सकाळी अटक केली. त्यांच्यावर मारहाण करणे, शिवीगाळ करणे व अश्लील वर्तणूक करणे, असे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

वादग्रस्त इतिहास
शिक्षणाधिकारी कैलास गोस्वामी यांचा इतिहास वादग्रस्त आहे. शिक्षकांचे अ‍ॅप्रूव्हल काढण्यासाठी ते पैसे घेतात, असा आरोप जिल्हा परिषदेच्या प्रत्येक सर्वसाधारण सभेत केला जात असे. मात्र, प्रत्यक्ष पुरावे असल्याशिवाय कारवाई करता येत नसल्याचे सांगितले जायचे. पटपडताळणीच्या काळात गोस्वामी यांनी जिल्हाधिका-यांनाच चुकीची माहिती देऊन त्यांची दिशाभूल केली.
शाळांच्या वेळा आणि पत्ते चुकीचे दिल्यामुळे पटपडताळणीसाठी गेलेल्या पथकांना ऐनवेळी शाळाच सापडल्या नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिका-यांनी पाठवला. त्यानंतरच जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत महिला सदस्यांनी त्यांच्याविरोधात
तक्रार केल्यानंतर माझ्याबद्दल बोलाल तर सभागृहाचीच धिंड काढीन, असे वक्तव्य गोस्वामी यांनी केले होते. त्यामुळे त्यांची कारकीर्द सातत्याने वादग्रस्त ठरत गेली.

जे पालकमंत्र्यांना जमले नाही...
गेल्या महिन्यात पालकमंत्री सतेज पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली होती. त्यामध्ये जिल्हा परिषद सदस्यांनी गोस्वामी यांच्या वर्तणुकीचा पाढा वाचला. जिल्हाधिका-यांनीही पडताळणीच्या काळातील त्यांच्या वर्तनाची माहिती पालकमंत्र्यांना दिली. मात्र, महिनाभरानंतरही गोस्वामी यांच्यावर कसलीच कारवाई झाली नव्हती.

पोलिस अहवालानंतर कारवाई
शिक्षणाधिकारी कैलास गोस्वामी यांना अटक झाल्याचा अहवाल आल्यानंतर त्यांच्यावर खात्यांतर्गत विभागीय चौकशीचा प्रस्ताव पाठवण्यात येईल. यापूर्वीही दोन प्रकरणांमध्ये त्यांच्यावर कारवाईचा प्रस्ताव पाठवलेला असून तो प्रलंबित आहे.
एस. पी. सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी