आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वादग्रस्त शिक्षणाधिकारी गोस्वामी अखेर निलंबित

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर - असभ्य वर्तनाने शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणारे शिक्षणाधिकारी कैलास गोस्वामी यांना शासनाने निलंबित केले आहे. महाराष्ट्र नागरी शिस्त व अपील अन्वये त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली असून गुरुवारी जिल्हा परिषद प्रशासनाला निलंबनाच्या आदेशाचा फॅक्स मिळाला.
लातूरचे शिक्षणाधिकारी कैलास गोस्वामी (माध्यमिक) विविध कारणांमुळे वादग्रस्त ठरले होते. काही महिन्यांपूर्वी झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत त्यांनी लोकप्रतिनिधींची धिंड काढण्याची भाषा केली होती. विज्ञान प्रदर्शनाचे ढिसाळ नियोजन व पटपडताळणीत सहकार्य न केल्याचा ठपकाही जिल्हा प्रशासनाने त्यांच्यावर ठेवला होता. या प्रक्ररणांची चौकशी शासनस्तरावर सुरू होती. यातच 10 जानेवारी रोजी गोस्वामी यांनी एका केशकर्तनालयात गोंधळ घालून नाभिकास मारहाण केली. या प्रकरणावरून त्यांच्यावर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला, त्यांना अटकही करण्यात आली. ही बाब गांभीर्याने घेत मुख्य कार्यकारी अधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी पालकमंत्र्यांनाही कळवले. गुरुवारी त्यांच्या निलंबनाचे आदेश निघाले. त्यांच्याऐवजी प्रभारी माध्यमिकचे शिक्षणाधिकारी म्हणून विलास जोशी यांच्याकडे पदभार देण्यात आला आहे.