लातूर - जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी रविवारी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने गेल्या सहा महिन्यांपासून बंडाची भाषा करणा-या आणि देशमुखांच्या नेतृत्वाला आव्हान देणा-या माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्या पत्नी प्रतिभा पाटील यांना संधी दिली. त्यामुळे काँग्रेसमध्ये निष्ठावंताना उपाशी राहावे लागेल आणि बंडाची भाषा करणा-यांना पदे मिळतील असा संदेश गेला आहे.
विलासराव देशमुखांचा १९९५ मध्ये विधानसभा निवडणुकीत पराभव करणा-या शिवाजीराव पाटील कव्हेकर यांचे राजकारण १९९९ मध्ये झालेल्या पराभवानंतर संपल्यात जमा होते. सगळ्या पक्षात जाऊन कुठेही सुखाचा संसार न करू शकणा-या कव्हेकरांना २००९ च्या निवडणुकीत खुद्द विलासरावांनीच काँग्रेसमध्ये आणले. त्यावेळी
आपले पुत्र अमित यांना भविष्यात अडसर ठरू नये म्हणून कव्हेकरांसाठी पायघड्या घालण्यात आल्या. मात्र, विलासरावांचा मृत्यू झाल्यानंतर कव्हेकरांच्या महत्त्वाकांक्षेने उचल खाल्ली. पुन्हा आमदार व्हायचेच या भावनेने त्यांनी अमित यांच्या नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह उभे करायला प्रारंभ केला. सहा महिने हा प्रकार सुरू असतानाच दिलीपराव देशमुख यांनी महिनाभरापूर्वी कव्हेकरांची जाहीरपणे खरडपट्टी काढली होती. तेव्हापासून कव्हेकर थंड पडले होते. मात्र, ते शहर किंवा ग्रामीणमधून बंडखोरी करून उभे ठाकणार असे त्यांनी वारंवार सांगितले. यापासून त्यांना परावृत्त करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा वापर करण्यात आला. कव्हेकरांच्या पत्नी प्रतिभा पाटील यांना अध्यक्षपदाची संधी देण्यात आली. त्यानंतर कव्हेकर विधानसभेला मैदानात राहणार नाहीत असे सांगण्यात आले. मात्र, देशमुख कुटुबीयांशी आणि पक्षाशी निष्ठा ठेवणा-यांची संधी यामुळे हुकली. निष्ठा न ठेवता आपणही कव्हेकरांप्रमाणे नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभे केले असते तर कदाचित आपल्याला संधी मिळाली असती असे काँग्रेसचेच नेते खासगीत बोलून दाखवत आहेत.
भविष्यात बंडाचे पेव
बंडखोरीच्या पवित्र्यात असणा-यांना पदे मिळतात हा संदेश गेल्यामुळे भविष्यात काँग्रेसमध्ये बंडखोरीला ऊत येईल असे राजकीय भविष्य वर्तवले जात आहे. काँग्रेसने कव्हेकरांना संधी देऊन स्वत:च्याच पायावर धोंडा मारून घेतला असल्याची चर्चा सुरू झाली आहे. विलासराव देशमुख यांनी नव्वदच्या दशकात कव्हेकरांना कृषी उत्पन्न बाजार समितीवर सभापती म्हणून संधी दिली होती. त्यानंतर कव्हेकरांनी त्या माध्यमातून ग्रामीण भागात संपर्क वाढवला. पुढे १९९५ मध्ये त्यांनी थेट विलासरावांच्या विरोधात निवडणूक लढवली आणि जिंकले. आता तर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्यांच्या हातात जणू जिल्ह्याचीच सत्ता आली आहे. त्यामुळे भविष्यात कव्हेकर देशमुखांना आणखी जड जाऊ शकतात असे दबक्या आवाजात म्हटले जाऊ लागले आहे.