आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लातूर निवडणूक : टक्का वाढणार; संधी बड्यांनाच

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर - स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी पन्नास टक्के आरक्षण दिल्यामुळे महिलांचा राजकारणातील टक्का वाढणार आहे. मात्र या संधीचा सर्वाधिक फायदा बड्या घरातील महिलांनाच होतो आहे. त्यामुळे सामान्य कार्यकर्ता महिलांची राजकारणातील वाट अद्यापही बिकटच आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महिलांना पन्नास टक्के जागा राखीव ठेवण्याच्या निर्णयाचे मोठे कौतुक झाले. या निर्णयामुळे सामान्य महिला राजकारणात येतील, असे आडाखे बांधण्यात आले.
मात्र ग्रामीण भागातील महिलांसाठी राजकारण हे क्षेत्र अद्याप सुकर झालेले नाही. एखादा मतदारसंघ महिलांसाठी राखीव झाला म्हटले की, सर्वच पक्षातील नेते नाके मुरडताहेत. या निर्णयामुळे महिला नेत्या-कार्यकर्तींना आनंद होऊन त्या तिकीट मागण्यासाठी गेल्यानंतर त्यांना येणारे अनुभव फारसे चांगले नाहीत.
तुमच्यात निवडून येण्याची क्षमता नाही...तुम्ही पैसे खर्च करू शकत नाही...असे सांगून त्यांची बोळवण केली जात आहे. महिलांसाठी राखीव असलेल्या ठिकाणी ही स्थिती आहे. खुल्या जागेवरून तर महिलांचा विचारसुद्धा केला जात नाही. महिला सक्षम नसतील तर त्यांना सक्षम करण्यासाठी पक्षपातळीवर कोणतेच प्रयत्न केले जात नाहीत. उलट एकही महिला कार्यकर्ती सक्षम नसल्याचे सांगत त्या-त्या भागातील प्रस्थापित राजकारण्याच्या घरातील महिलांची नावे चर्चेला आणली जातात. महिलांसाठी राखीव नसलेल्या ठिकाणी एकाही महिला उमेदवाराला तिकीट मिळत नाही. किंबहुना महिलेचे नावही चर्चेला आणले जात नाही.
शिवसेनेने मात्र आपल्याला दोन वेळेस खुल्या जागेवरून उमेदवारी दिली होती. त्यामुळे इतर पक्षांपेक्षा शिवसेना वेगळा पक्ष आहे, असे शिवसेनेच्या माजी जिल्हा सरचिटणीस डॉ. शोभा बेंजरगे यांनी सांगितले.
पालिकांतही आला होता असाच अनुभव
महिनाभरापूर्वी नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या. त्यामध्येही महिला उमेदवारांचा शोध घेताना राजकीय पक्षांची दमछाक झाली होती. अहमदपूरमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सर्वच 19 जागांवर महिला उमेदवार उभे करण्याची घोषणा केली होती; मात्र त्यांना केवळ एकच महिला उमेदवार मिळू शकली.

कार्यकर्त्या नकोत..कठपुतळ्या हव्यात
राजकीय पक्षातील पुरुषी नेतृत्वाला सक्षम महिला राजकारणात नकोशा आहेत. सक्षम महिला आल्या तर त्यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात येईल, अशी भीती पुरुष नेतृत्वाला वाटत असते. त्यांना कार्यकर्त्या नकोत तर त्यांच्या तालावर नाचणाºया कठपुतळ्या हव्या आहेत. त्यामुळे महिला उमेदवार नसल्याची ओरड जाणीवपूर्वक केली जात आहे.
डॉ. शोभा बेंजरगे, माजी जिल्हा सरचिटणीस, शिवसेना

महिला आहेत...तिकीट नाही
काँग्रेससह सर्वच राजकीय पक्षांमध्ये महिलांची संख्या चांगली आहे. मात्र सर्वच पक्षांतील पुरुष नेत्यांना राजकारणात सामान्य घरातील महिला नको आहेत. राजकारणात सक्रिय असलेल्या महिला कार्यकर्त्यांऐवजी नेत्यांच्या घरातील नावे पुढे केली जात आहेत. त्यामुळे जाणीवपूर्वक महिला उमेदवारांची वानवा असल्याची चर्चा माध्यमांद्वारे घडवून आणली जात आहे. आजमितीला लातूर जिल्ह्यातील एका जिल्हा परिषद मतदारसंघातून किमान पाच-सात महिलांचे अर्ज आलेले आहेत. मग महिला उमेदवार नाही असे कसे म्हणणार...
स्वयंप्रभा पाटील, जिल्हाध्यक्षा, महिला काँग्रेस