आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Laturakar Aggressive For New Revenue Divisional Office

मुख्यालयासाठी लातूरकर आक्रमकपणे लढा देणार, सर्व पातळ्यांवर लढा देण्याचा बैठकीत निर्णय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर- राज्य सरकारने मराठवाड्यातील दुसरे विभागीय महसूल कार्यालय नांदेडला सुरू करण्याचा अध्यादेश काढल्याने लातूरकर आक्रमक झाले आहेत. हे कार्यालय लातूरला होण्यासाठी सर्व पातळ्यांवर लढा देण्याचा निर्णय रविवारच्या सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात आला.
मराठवाड्यातील दुस-या विभागीय कार्यालयावरून लातूर व नांदेडमध्ये वाद सुरू होता. या प्रकरणी लातूरकरांनी उच्च न्यायालयातही धाव घेतली होती. न्यायालयाने हे कार्यालय लातूरला की नांदेडला व्हावे यासाठी दावे, हरकती मागवण्याचे आदेश दिले होते; परंतु सरकारने नांदेडला कार्यालय करण्यासाठी अध्यादेश काढल्याने लातूरकर संतप्त झाले आहेत. त्यामुळे सर्वच पातळ्यांवर आक्रमकपणे लढा देण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला. राजकीय, सामाजिक, कायदेशीर मार्गाने लढा उभारण्याबरोबरच आंदोलनाचे हत्यारही उपसले जाणार आहे. आंदोलनात सामान्य जनतेला सहभागी करून घेण्याबरोबरच अंबाजोगाई, उस्मानाबादकरांनाही त्यात सामील करून घेतले जाणार आहे. 9 जानेवारीला पालकमंत्री पंकजा मुंडे लातूर दौऱ्यावर येत आहेत. या वेळी त्यांना िनवेदन देऊन या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालावे म्हणून त्यांना साकडे घालण्यात येणार आहे. शिवाय या प्रश्नावर पंकजा मुंडे यांनीच नेतृत्व करावे म्हणून त्यांना विनंती करण्यात येणार आहे.

संघर्ष समितीवर चर्चा : संघर्ष समिती स्थापण्यासाठी चर्चा झाली. तिचे कार्याध्यक्षपद अ‍ॅड. व्यंकट बेद्रे यांच्याकडे ठेवण्याची सूचना अशोक गोविंदपूरकर यांनी केली. काही जणांनी संघर्ष समितीचे अध्यक्षपद खासदार सुनील गायकवाड यांच्याकडे देण्याची सूचना केली.
यांनी घेतली बैठक
बैठकीला ज्येष्ठ विधिज्ञ मनोहरराव गोमारे, आमदार त्र्यंबक भिसे, महापौर अख्तर शेख, अ‍ॅड. व्यंकट बेद्रे, अ‍ॅड. उदय गवारे, अशोक गोविंदपूरकर, अ‍ॅड. त्र्यंबकदास झंवर, शैलेश लाहोटी, सुधीर धुत्तेकर, मोहन माने, भारत साबदे, अण्णाराव पाटील, बळवंत जाधव, प्रदीप मोरे, वैजनाथ शिंदे, बसवंतअप्पा उबाळे, मुर्गाप्पा खुमसे, प्रकाश पाटील, प्रदीप गंगणे, निशांत स्वामी, एजाज शेख, माधव बावगे, संजय ओहळ, राहुल माकणीकर, दत्ता मस्के, गणेश गवारे, जमील शेख, रघुनाथ बनसोडे आदी उपस्थित उपस्थित होते.
असाही पर्याय
अंबाजोगाईला जिल्ह्याचा दर्जा देऊन लातूर, उस्मानाबाद व अंबाजोगाईसाठी स्वतंत्र विभागीय आयुक्तालय सुरू करण्यासाठी सरकारकडे प्रस्ताव दिला जाणार आहे.
संघर्ष अधिक बुलंद करावा
मागण्या आणि विनंत्या करण्याबरोबरच कायद्याने लढून नेहमीच न्याय मिळतो असे नाही. त्यामुळे रस्त्यावरचा संघर्ष अधिक बुलंद करावा लागेल. त्यासाठी मी सर्वात पुढे असेन. मुर्गाप्पा खुमसे, स्वातंत्र्यसैनिक, लातूर
लातूरचा नैसर्गिक हक्क
लातुरात 29 विभागीय कार्यालये असून आयुक्तालयासाठी लागणारी इमारतही बांधून तयार आहे. त्यामुळे आयुक्तालयावर लातूरचा नैसर्गिक हक्क आहे. या प्रकरणी सोमवारी लातूरचे एक शिष्टमंडळ औरंगाबाद उच्च न्यायालयातील विधिज्ञांशी चर्चा करून याचिका दाखल करण्याचा पर्याय पडताळून पाहणार आहे. अ‍ॅड. त्र्यंबकदास झंवर, काँग्रेस नेते, लातूर