आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लातूरचे साडेतीन टीएमसी पाणी गेले कर्नाटकात वाहून, साठवण क्षमता नसल्याचा फटका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - दैवं देतं आणि कर्म नेतं...देणाऱ्याचे हात हजारो..दुबळी माझी झोळी गं अशी वाक्ये आपण नेहमी ऐकतो. लातूरच्या पाण्याच्या स्थितीबाबत ही वाक्ये अगदी चपखल बसतात. कारण रेल्वेने मिरजेहून पाणी आणाव्या लागलेल्या दुष्काळग्रस्त लातूर जिल्ह्यातून गेल्या शनिवारी एकाच दिवसात तब्बल ९८ दशलक्ष घनमीटर म्हणजेच तब्बल साडेतीन टीएमसी पाणी वाहून गेले.

गेली तीन वर्षे लातूर जिल्ह्यात सातत्याने कमी पाऊस पडतो आहे. मांजरा धरणाच्या लाभक्षेत्रातही गेली तीन वर्षे पाऊस पडलेला नाही. त्यामुळेच या परिसराला दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. गेल्या काही वर्षांत पावसात सातत्य राहिलेले नाही. पावसाळ्यात पूर्वीसारखा पाऊस पडत नसला तरी एकाच दिवसात मोठा पाऊस पडणे, एकाच रात्रीत पाऊस पडणे असे प्रकार होतात. त्यामुळे साठवण क्षमता वाढवल्या तर एकाच वेळी पडलेला पाऊस अडवता येऊ शकतो हे ओळखून मांजरा धरणाच्या खाली नदीवर उच्चस्तरीय बंधाऱ्यांची श्रृंखला तयार करण्यात आली. त्यामध्ये लातूर जिल्ह्यातून वाहणाऱ्या मांजरा नदीचे १४७ किलोमीटरचे पात्र कायमस्वरूपी भरलेले राहील अशी तजवीज करण्यात आली. कमी भूसंपादन करून जास्तीचे पाणी अडवण्यासाठी हे प्रकल्प उभारण्यात आले. गेल्या वर्षी यातील काहींचे काम पूर्ण झाले, तर काही बंधाऱ्यांचे काम पूर्ण झाले असले तरी शेतकऱ्यांचा मावेजा मिळाला नसल्यामुळे पूर्ण क्षमतेने बंधाऱ्यात पाणी अडवता येत नाही अशी स्थिती आहे.

शनिवारचा पाऊस गेला वाहून: लातूर जिल्ह्यात गेल्या शनिवारच्या रात्री जोरदार पाऊस झाला. रेणापूर तालुक्यात ११० ते १८० मिलिमीटर पावसाची नोंंद झाली. लातूर तालुक्यात १११ मिलिमीटर पाऊस पडला. शिरूर अनंतपाळ तालुक्यातही ७० मिमी पाऊस झाला. जिल्ह्यात सर्वत्र पडलेल्या या पावसाने मांजरा, तेरणा, तावरजा, रेणा या नद्यांवरील सर्व बंधाऱ्यांत पाणी आले. त्यापैकी साई, शिवणी, धनेगाव या बंधाऱ्यांत पाणी पूर्ण क्षमतेने अडवता आले नाही. साठवण क्षमतेच्या तिप्पट पाऊस पडल्यामुळे उर्वरित पाणी पुराच्या भयामुळे सोडून द्यावे लागले. त्याचा हिशेब केला तर साडेतीन टीएमसी पाणी नदीपात्रातून कर्नाटकात वाहून गेले. धनेगाव, शिवणी, साई यासारख्या ठिकाणी सरकारने शेतकऱ्यांचा मावेजा दिला असता तर किमान १ टीएमसी पाणी साठवता येऊ शकले असते.
असे वाहिले पाणी
जोरदार पाऊस झाल्यानंतर रविवारी पहाटेपासून खुलगापूर, बिंदगीहाळ, शिवणी, डोंगरगाव येथील बंधाऱ्याचे गेट उघडण्यात आले. धनेगाव बंधाऱ्यांचे सातपैकी पाच दरवाजे रविवारी पहाटे तीन वाजता साडेतीन मीटरने उचलण्यात आले. त्यातून ६५० (क्युमेक्स) पाणी सोमवारी रात्री १२ वाजेपर्यंत वाहत होते. त्यातून साडेतीन टीएमसी पाणी वाहून गेले.
मांजरा धरण कोरडेच
एकीकडे मांजरा धरणाच्या खाली पडलेले पावसाचे साडेतीन टीएमसी पाणी साठवण क्षमतेअभावी वाहून गेले असताना दुसरीकडे मांजरा धरणाच्या क्षेत्रात मात्र पाऊस झालेला नाही. त्यामुळे मांजरा धरण आजही कोरडेच आहे. या धरणावरून लातूरसह महत्त्वाच्या शहरांच्या पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत. मात्र तेथे पाणी नाही आणि भविष्यातही हीच स्थिती राहिली तर लातूरवर पुन्हा एकदा पाणीसंकट येऊ शकते. सध्या बंधाऱ्यात साठलेले पाणी लातूरला फारतर डिसेंबरपर्यंत पुरवले जाऊ शकते. त्याचबरोबर जायकवाडीच्या वरच्या भागात धरणे भरल्यानंतर त्यातील पाणी कालव्याद्वारे सोडून इतर तलाव, मध्यम प्रकल्प भरून घेतले गेले. त्याच धर्तीवर आजही कोरडे असलेले मध्यम प्रकल्प भरून घेता आले असते. कालवेच तयार केलेले नाहीत. त्यामुळे पाणी वाहून जाऊ देण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
पाण्याचे मोल पैशापेक्षा जास्त
भीषण टंचाई अनुभवलेल्या लातूरने गेल्या वर्षी पाण्यासाठी कोट्यवधी रुपये मोजले. एकट्या लातूरमध्ये रोज ३५ ते ४० लाख रुपयांचे पाणी विकले जायचे. ६ महिने पाणी विकत घ्यावे लागले. आजही अनेक ठिकाणी विकतचेच पाणी सुरू आहे. त्याचबरोबर टँकर व रेल्वेसाठी कोट्यवधी रुपये खर्च झाले. शेतकऱ्यांच्या मावेजाची किंमत कमी आहे. सरकारने कायमस्वरूपी पर्याय करण्यापेक्षा मलमपट्टीवर पैसे खर्च केले.
मांजरा नदीच्या खाली एकही मोठा प्रकल्प नसल्याने सर्व पाणी वाहून जाते. छाया : दिव्य मराठी
बातम्या आणखी आहेत...