लातूर - पाणीटंचाईचा आणि चित्रकलेचा काही संबंध असू शकतो? सामान्यपणे याचे उत्तर नाही, असेच आहे. मात्र, कलाकारात संवेदनशीलता असेल तर भोवतालच्या सामाजिक वास्तवाचे प्रतिबिंब त्याच्या कलेतून उमटत असते. लातूरच्या शिवाजी हांडे या चित्रकाराच्या संवेदनशील मनाला शहरातल्या पाणीटंचाईची तीव्रता जाणवली आणि साकारले एक चित्र. ते त्यांनी सोशल मीडियावर टाकले आणि पाहता-पाहता ते व्हायरल झाले.
शिवाजी हांडे हे लातूरच्या एका शाळेत चित्रकलेचे शिक्षक. त्यांनी अनेक मानवी चेहऱ्यांची रेखाचित्रे काढली आहेत. विविध विषयांवरची चित्रे काढणे हा त्यांचा हातखंडा. कलाकार मग तो कोणत्याही क्षेत्रातला असो, त्याच्या सभोवताली चालणाऱ्या घटना-घडामोडींचे प्रतिबिंब त्याच्या कलेतून पडतेच. तसा तो शिवाजी हांडे यांच्यावरही पडला. सध्या लातूर शहरात तीव्र पाणीटंचाई आहे. शहराला फेब्रुवारी महिन्यापासून नळाद्वारे पाणीपुरवठा करणे शक्य नसल्याचे महापौर, आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केले आहे. फेब्रुवारीपासून पाणीपुरवठ्याचे नियोजन कसे लावणार याचे उत्तर कोणाकडेही नाही. त्यामुळे आजघडीला शहरात किमान ७०० खासगी टँकर सुरू आहेत. फेब्रुवारीपासून लातूरला पाणी कसे पुरवता येईल यासाठीचे किमान सहा ते सात पर्याय महापालिकेकडे असल्याचे आयुक्त सांगतात. मात्र, एकावरही ठोस कार्यवाही झालेली नाही. पेट्रोल पंपाच्या धर्तीवर लातूरला पाणीपुरवले जाईल, अशी कल्पना शिवाजी हांडे यांना सुचली. पंपावर पेट्रोल भरायला जशी गाड्यांची रांग लागते अगदी तशीच घागरींची रांग लागेल, असे चित्र त्यांनी रेखाटले आणि दोन दिवसांपूर्वी फेसबुकवर टाकले आणि ते व्हायरल झाले. अशीच काही चित्रे त्यांनी मराठवाड्याच्या टंचाईच्या अनुषंगाने काढली आहेत. तसेच ‘तिळगूळ घ्या’च्या ऐवजी ‘पाणी द्या, पाणी घ्या’ असा संदेश देणारे चित्रही त्यांनी रेखाटले.
कॉमेंटचा पाऊस
शिवाजी हांडे यांनी पाणीटंचाईच्या अनुषंगाने साकारलेल्या चित्रांना अनेक लाइक्स तर मिळाल्याच, पण अनेकांनी ते शेअर केले. त्याच्यावर सल्ला, सूचना, कौतुक, उपहास अशा संमिश्र कॉमेंटचा तर पाऊसच पडला.
चित्ररूपाने जलजागृतीचा प्रयत्न
या पुढे नळाला पाणीच येणार नाही ही कल्पनाच करवत नाही; पण हे वास्तव मी स्वीकारले आणि डोक्यात विचारचक्र सुरू झाले . माझ्या परीने चित्ररूपाने जलजागृती करण्याचा हा प्रयत्न असून मी तो सातत्याने करत राहणार आहे. ही लढाई आपली सर्वांची आहे.
शिवाजी हांडे, चित्रकार, लातूर
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, भीषण पाणीटंचाई दर्शवणारे चित्र...