आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एलबीटी : दुसऱ्या दिवशीही परभणीची बाजारपेठ बंद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी - जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल, मनपा आयुक्त राहुल रेखावार यांच्यासह जिल्हा व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत सोमवारी एलबीटीवर कोणताही तोडगा न निघाल्याने मंगळवारी (दि.२७) दुसऱ्या दिवशीही परभणीची बाजारपेठ कडकडीत बंद राहिली. दरम्यान, जिल्हा व्यापारी महासंघानेही आपल्या भूमिकेवर ठाम राहून जोपर्यंत प्रशासनाकडून लेखी पत्र प्राप्त होत नाही, तोपर्यंत कोणतीही दुकाने उघडली जाणार नाहीत, असे महासंघाने स्पष्ट केले आहे.
एलबीटी गतवर्षी रद्द झाला असला तरीदेखील त्या तारखेपर्यंतच्या पूर्वीच्या कराचे असेसमेंट महापालिकेने नियुक्त केलेल्या खासगी एजन्सीकडून सध्या सुरू आहे. मात्र, असेसमेंट करताना त्यात जाचक अटी टाकण्यात आल्या आहेत. व्यापाऱ्यांची पिळवणूक करण्याचे काम केले जात आहे, असा आरोप करत या जाचक अटी रद्द करण्यात याव्यात, या मागणीसाठी जिल्हा व्यापारी महासंघाने मनपा आयुक्त राहुल रेखावार यांना बेमुदत बंद आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र, आयुक्त रेखावार यांनी याबाबत कोणतीही कार्यवाही न केल्याने महासंघाने नियोजित केलेला बेमुदत बंद सोमवारपासून (दि.२६) सुरू केला. यापूर्वीही गेल्या काही दिवसांत महापौर संगीता वडकर, उपमहापौर भगवान वाघमारे यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठका घेण्यात आल्या होत्या. मात्र, त्यावरही तोडगा न निघाल्याने व्यापारी महासंघाने सोमवारपासून बाजारपेठ बंद ठेवली.
सोमवारी व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून प्रशासनासोबत झालेल्या बैठकीत तोडगा निघाला नाही. त्यामुळे मंगळवारीही बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. मध्यवर्ती बाजारपेठ बंद होती, मात्र वसमत रस्ता, जिंतूर रस्त्यावरील दुकाने व्यापाऱ्यांतील संभ्रमावस्थेमुळे सुरू होती. ती महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी फिरून बंद करण्यास सांगितली. यात मेडिकलसह सर्वच व्यापारी संघटनांनी बंद ठेवल्याने नागरिकांची गैरसोय झाली.

शिवसेनेचा व्यापाऱ्यांना पाठिंबा
शिवसेनेने व्यापारी महासंघाच्या आंदोलनास पाठिंबा दर्शवत महापालिकेने एलबीटीतील जाचक अटी रद्द कराव्यात, अशी मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. हिशेब पूर्ण करण्यासाठी विविध प्रकारची कागदपत्रे मागवून व्यापाऱ्यांना वेठीस धरण्याचे प्रकार
थांबवावेत, अन्यथा शिवसेना या प्रश्नी तीव्र आंदोलन करेल, असा इशारा आमदार डॉ. राहुल पाटील, गंगाप्रसाद आणेराव यांनी दिला आहे.
बातम्या आणखी आहेत...