आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्राध्यापकांच्या वेतनातून विद्यार्थ्यांसाठी मेसचा खर्च, दुष्काळी स्थितीला हातभार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना - अंबड येथील मत्स्योदरी महाविद्यालयाच्या वसतिगृहातील शेतक-यांच्या मुलां-मुलींसाठी दुष्काळी परिस्थितीत काहीतरी हातभार लागावा या हेतूने प्राचार्य डॉ. भागवतराव कटारे यांच्यासह ६० प्राध्यापकांनी एक दिवसाचे वेतन एकत्रित करून १५० जणांंसाठी तीन महिने भोजन देऊन शिक्षणाचाही खर्च उचलला आहे.

मत्स्योदरी महाविद्यालयात ७० टक्के ग्रामीण भागातील शेतक-यांची मुला-मुलींचे प्रवेश आहेत. अंबड आणि घनसावंगी तालुक्यांत सतत दुष्काळ पडत आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे शेतक-यांची आर्थिक स्थिती जेमतेम असल्याने त्यांची मुले वसतिगृहात राहून शिक्षण घेतात; परंतु मागील काही दिवसांपासून विद्यार्थ्यांना शैक्षणिक खर्च करणे शक्य होत नव्हते. अनेक शेतकरी आपल्या पाल्यांसाठी मेसला लागणारे पैसे महिन्याला पाठवायचे; परंतु दुष्काळी परिस्थितीमुळे घरून येणारे पैसे बंद झाले. त्यातच काही विद्यार्थ्यांना पैसे मिळाले तर दोन विद्यार्थ्यांत एक डबा खायचे. हे चित्र प्राचार्य डॉ. कटारे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी प्राध्यापकांची बैठक घेतली. यात वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी परीक्षा होईपर्यंत दोन वेळचे जेवण देण्याचा प्रस्ताव ठेवला. यासाठी लागणारा खर्च प्राध्यापकांनी आपल्या वेतनातील एक दिवसाचा पगार देण्याची तयारी दर्शविली. फेब्रुवारीपासून वसतिगृहातील ९० मुली आणि ६० मुले यांच्यासाठी वसतिगृहातच मेस सुरू केली. ही मेस १८ एप्रिलपर्यंत सुरू ठेवली. यासाठी दर महिन्याला १ लाख ५० हजार रुपये खर्च येत होता. खासगी मेससाठी विद्यार्थ्यास महिन्याला १ हजार ५०० रुपये खर्च येत होता, तो वाचला. या उपक्रमासाठी उपप्राचार्य डॉ. विश्वास कदम, प्रा. सदाशिव भुसारे, पांडुरंग गहिरे, प्रा. पांडुरंग काळे, प्रा. दिगंबर भुतेकर, डॉ. प्रशांत तौर, प्रा. एस. एम. कोल्हे, प्रा. शिंगणे, प्रा. नागरे, प्रा. लांडगे आदींनी परिश्रम घेतले.

महिन्याला दीड लाख खर्च
वसतिगृहातील मुलामुलींसाठी मेस सुरू केल्यानंतर त्यांना दोन वेळचे जेवण तयार करण्यासाठी वसतिगृहातच आचारी नेमण्यात आला. तीन महिन्यांचे धान्य खरेदीसह किराणा आदी साहित्य जमा करण्यात आले. १६० विद्यार्थ्यांसाठी महिन्याला दीड लाख रुपये खर्च आला. जेवण रुचकर व स्वादिष्ट दिल्याने विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले.

रोज राष्ट्रगीत
या महाविद्यालयात रोज राष्ट्रगीताचे गायन केले जाते. तसेच सर्वांना गणेवश बंधनकारक, कॉपीमुक्त परीक्षा, नियमित तासिका, प्रयोगशाळा आदी उपक्रम राबवले जातात.

अडचणीच्यावेळी पाठीशी
विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून ज्या ज्या वेळी विद्यार्थी अडचणीत येतील त्या त्या वेळी हे महाविद्यालय त्यांच्या पाठीशी उभे असते. वसतिगृहातील काही मुले-मुली एका डब्यात दोन जण जेवण करतात. मेसचा खर्च पेलवत नाही, म्हणून अनेकांनी शिक्षण बंद केले होते. परंतु त्यांना या प्रवाहात आणण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने हा सामाजिक उपक्रम राबवू शकलो.
डॉ. भागवतराव कटारे, प्राचार्य, मत्स्योदरी महा.