आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डावी आघाडी नव्हे, बिहारमधल्या परिवर्तनासाठी प्रयत्न : शरद पवार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - डावी आघाडी वगैरे काही नाही, बिहारमधल्या विधानसभा निवडणुकीत एकत्र आलेल्या नितीशकुमार-लालूप्रसाद यादवांना मदत करता यावी या हेतूने बैठक घेतली, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले. ते उस्मानाबादेत पत्रकारांशी बोलत होते.
दुष्काळी भागाची पाहणी करण्यासाठी पवार शुक्रवारपासून तीन दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत. उस्मानाबादेतील मेार्चाचे नेतृत्व केल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. या वेळी डाव्या आघाडीबद्दल प्रश्न विचारण्यात आल्यानंतर ते म्हणाले, बिहार हे माझ्या दृष्टीने परिवर्तन घडवून आणणारे राज्य आहे. स्वातंत्र्यपूर्व चळवळीची सुरुवात बिहारपासून झाली होती. त्यानंतर जयप्रकाश नारायण यांनी बिहारमध्ये उभारलेल्या लढ्यानंतर संपूर्ण देशामध्ये परिवर्तन घडून आले होते. आजच्या वातावरणात काहीतरी बदल घडवण्याचा प्रयत्न करता येतो का, यासंदर्भातला प्रयत्न सुरू आहे. ते म्हणाले, देशाचे पंतप्रधान सभागृहाचे प्रमुख असतात. संसदेचे कामकाज सुरळीत चालते की नाही, हे पाहण्याची, ते चालवण्याची आणि त्यासंबंधी काही सदस्यांचे मतभेद असतील तर त्यावर चर्चा घडवून आणण्याची त्यांची जबाबदारी आहे. तसे त्यांनी केलेले नाही. याउलट नायडू यांनी काही प्रमाणात प्रयत्न केले. मराठवाड्यातील परभणी, उस्मानाबाद, बीड आणि लातूर या चार जिल्ह्यांतील दुष्काळी परिस्थिती उद्भवली आहे.
शेतकरी उद्ध्वस्त होत आहेत. त्यामुळे आम्ही सरकारकडे मदतीचा आग्रह धरला होता. त्यानंतर केंद्र सरकारने या भागाच्या पाहणीसाठी दुष्काळी अधिकाऱ्यांचे पथक पाठवले. पथकाने पाहणी केली, मात्र त्यांनी अहवाल कोणत्या स्वरूपाचा दिला, याची कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही. शेतकऱ्यांसाठी आर्थिक साहाय्य करावे, अशी मागणी राज्य सरकारने केंद्राकडे करायची असते. ती केली की नाही, हे राज्य सरकारने स्पष्ट केलेले नाही. वेळीच दखल घेतली नाही तर शेती उद्योग उद्ध्वस्त होतो. शेतकरी संकटात सापडल्यानंतर त्यांना मदत करावी लागते. जनावरांना चारा, हाताला रोजगार देऊन संकटातून मार्ग काढावा लागतो. सध्या तरी राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी स्पष्ट धोरण बाहेर आलेले नाही. सरकारने यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.

दुष्काळाची कल्पना होती
मराठवाड्यात दुष्काळाची अशी स्थिती निर्माण होईल, याचा आपल्याला अंदाज आला होता. देशातील आणि बाहेरील हवामान विभागाकडून वातावरणाबाबत अंदाज घेत असतो. तेव्हा या परिस्थितीची जाणीव झाली होती. त्यामुळेच आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यासह मराठवाड्यातील आमदारांच्या संयुक्त मंडळाला घेऊन मी २ जून रोजी मुख्यमंत्र्यांना भेटलो होतो. त्यांना चित्र सांगून उपाययोजना करण्याची मागणी केली होती, असे पवार यांनी सांगितले.
मुख्यमंंत्र्यांना प्रत्युत्तर
मुख्यमंत्री फडणवीस यांनी पवारांवर टीका करताना १५ वर्षांत काय केले, असा सवाल केला होता. त्यावर प्रत्युत्तर देताना पवार म्हणाले, ज्या ज्या वेळी महाराष्ट्रातील शेतकरी संकटात सापडले, त्या त्या वेळी त्यांना मदत केली आहे. दुष्काळ प्रश्नावर जे-जे पुढे येतील, त्यांची मदत घेतली पाहिजे. कोण काय म्हणतोय हे मी पाहणार नाही, असे ते म्हणाले.

...तर राजकीय संघर्ष
राज्य सरकारने शेतकऱ्यांचे दु:ख समजून घ्यावे, त्यांना पुन्हा एकदा संधी देणार आहोत. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आता गप्प बसणार नाही, असा इशारा देत पवार यांनी लातूर, परभणी आणि उस्मानाबाद जिल्ह्यात १४ सप्टेंबरपासून आंदोलन करू, असे स्पष्ट केले. मात्र, राष्ट्रवादीच्या मोर्चामध्ये पवार यांनी राज्यभर आंदोलन करू, असा इशारा दिला होता. पत्रकार परिषदेत त्यांनी तीन जिल्ह्यांचाच उल्लेख केला. त्यामुळे त्यांच्या आंदोलनाबाबत संदिग्धता कायम आहे.

कृत्रिम पावसाचा अनुभव चांगला नाही
महाराष्ट्रात यापूर्वी कृत्रिम पावसाचा प्रयत्न आम्ही केला होता. परंतु ज्या भागात प्रयोग केला त्याच्या परिसरात फर्लांगभर पाऊस पडतो, असा अनुभव आहे. त्यामुळे पुरेशी ओलही निर्माण होत नाही. जमिनीत पाणी मुरत नाही. मात्र, राज्य सरकार असा प्रयत्न करीत आहे. ते बरोबर की चूक हे मी आत्ताच सांगणार नाही; परंतु कृत्रिम पावसाचा अनुभव फारसा चांगला नाही, असे पवार यांनी सांगितले.