आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वैजापूर तालुक्यात बिबट्याचा हल्ला, ७ जखमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिऊर - वैजापूर तालुक्यातील बळ्हेगाव परिसरात शुक्रवारी सकाळी सात ते सायंकाळी पाच असे १० तास बिबट्याने धुमाकूळ घातला. दिवसभरात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दोन वन अधिकारी, पाच ग्रामस्थ असे एकूण सात जण जखमी झाले. बिबट्याला पकडण्यासाठी शिऊर पोलिसांसह वन विभागाचा मोठा फौजफाटा तैनात होता. मात्र, बघ्यांची गर्दी झाल्यामुळे बिबट्याला बेशुद्ध करण्याचे सगळे प्रयत्न निष्फळ ठरले. रात्री बिबट्या खामगाव, सहानगाव शिवारात पसार झाला.

शुक्रवारी पहाटे मनोली शेतवस्त्यावरील शेतकर्‍यांना बिबट्या वावरत असल्याचे आढळले. सकाळी सातच्या सुमारास संतोष सूर्यवंशी (२०, मनोली) याच्यावर बिबट्याने हल्ला केला. यात तो किरकोळ जखमी झाला. त्यानंतर बळ्हेगाव येथील संजय आवारे याच्यावरही काटेरी झुडपात दबा धरून बसलेल्या बिबट्याने जोरदार हल्ला केला. यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांना औरंगाबादेतील घाटी रुग्णालयात हलवण्यात आले. घटनेची माहिती मिळताच शिऊर ठाण्याचे पोलिस निरीक्षक एस. टी. चौधरी यांनी तीन कर्मचार्‍यांसह घटनास्थळ गाठले.

पिंजर्‍यातही अडकला नाही : दुपारी दोनच्या सुमारास उप वनसंरक्षक अधिकारी ए. डी. भोसले, वनपरीक्षक एम. के. कांबळे, वनपरिक्षेत्र अधिकारी आर. ए. नागापूरकर तसेच वनाधिकारी एस. के. चंदेले, जया तरटे, बी. यु. गाडगीळ, ई. एल. कान्हेरे घटनास्थळी दाखल झाले. काटेरी झुडपात दबा धरून बसलेल्या बिबट्यासाठी पिंजरा ठेवत त्यात बकरीचे पिल्लू सोडण्यात आले. मात्र, ग्रामस्थांच्या गर्दीमुळे पिंजर्‍यात बिबट्या अडकणे अशक्य झाले. हे पाहून शुटर आर. पी. अष्टेकर यांना बोलवण्यात आले.

गाेळी झाडली पण... : दुपारी अडीच वाजता रायफलमधून बिबट्याला बेशुद्ध करण्यासाठी गोळी झाडण्यात आली. मात्र तेथून धूम ठोकत बिबट्या ५०० फुटांवरील झुडपांत लपला.

चार वेळा इंजेक्शन
बिबट्याला पकडण्याच्या मोहिमेदरम्यान चार वेळा बेशुद्धीचे इंजेक्शन देण्यात आले, परंतु बघ्यांची गर्दी, हुल्लडबाजी आणि गोंगाटामुळे बिबट्या बेशुद्ध न होता चवताळून झाडावर तर कधी झुडपात लपत होता. या दरम्यान बिबट्याने उप वनसंरक्षक अधिकारी ए. डी. भोसले, वनरक्षक प्रकाश सूर्यवंशी व ग्रामस्थ ज्ञानेश्वर तुपे, सोमनाथ कदम यांच्यावर अर्ध्या तासाच्या अंतरात हल्ले करून जखमी केले. दिवसभरात एकूण सात जण जखमी झाले.
(फोटो : वन विभागाच्या अधिकार्‍यांनी बिबट्याला बेशुद्ध करण्याचे प्रयत्न केले. त्यांना यश आले नाही. छाया- संजय पगारे, शांताराम मगर)