आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Leopard Attack On Fore, Three Serious With A Woman

बिबट्याचा चौघांवर हल्ला; तीनजण गंभीर जखमी, किनवट तालुक्यातील घटना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड- किनवट तालुक्यातील इस्लापूर वन परिक्षेत्रात असलेल्या गोंडे महागाव येथे बुधवारी पहाटे साडेपाचच्या सुमाराला बिबट्याने चार जणांवर प्राणघातक हल्ला केला. जखमीमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. गंभीर जखमी झालेल्या ३ जणांना नांदेड येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

गोंडे महागाव हे तेलंगणा सीमेला लागून असलेले दुर्गम भागातील गाव आहे. पहाटे साडेपाचच्या सुमाराला गावातील रंगराव सुक्या राठोड (४५), प्रल्हाद चव्हाण (३८), ललिता भीमराव राठोड (३२), विठ्ठल राठोड (३५) हे चौघे प्रातर्विधीसाठी जंगलात गेले. त्या वेळी बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. यात तीन जण गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच इस्लापूर पोलिस, वन विभागाचे पथक तातडीने गोंडे महागाव येथे दाखल झाले. त्यांनी जखमींना उपचारासाठी इस्लापूर येथील आरोग्य केंद्रात आणले. येथे प्राथमिक उपचार करून विठ्ठल राठोड वगळता तीन जखमींना नांदेड येथेहलवण्यात आले.

हल्ला करणाऱ्या प्राण्याचा शोध सुरू
चार जणांवर नेमका कोणी हल्ला केला याबाबत संभ्रम निर्माण झाला. गावाला लागून असलेल्या तेलंगणातील गावातही अशाच प्रकारे प्रातर्विधीला जाणाऱ्या काही लोकांवर हल्ला झाला. तो प्राणी बिबट्या नसून तडस असल्याचे सांगण्यात येते. बिबट्या एका वेळी एवढे हल्ले करीत नाही. त्यामुळे हा हल्ला नेमक्या कोणत्या प्राण्याने केला याचा शोध घेण्यात येत असल्याचे इस्लापूरचे वनपरिक्षेत्राधिकारी एस. बी. पेहरकर यांनी सांगितले.

हल्ला करणारा प्राणी तेलंगणा हद्दीत पळाला
उपवन परिक्षेत्राधिकारी गोविंद बिडवई यांनी रुग्णालयात दाखल केलेल्या जखमींची विचारपूस केली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्ला करणारा प्राणी बिबट्याच होता. या हल्ल्यानंतर हल्ला करणारा प्राणी तेलंगणाच्या हद्दीतील जंगलात पळून गेला. त्याचा शोध सुरू असल्याचे बिडवई यांनी सांगितले.
पुढील स्लाइड्सवर पाहा, जखमींचे फोटोज