आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोल्हा गावात बिबट्या विहिरीत पडला, दोन तासांनंतर पिंजऱ्यात अडकला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड - मुदखेड तालुक्यातील कोल्हा गावात मंगळवारी रात्री २ वाजताच्या सुमाराला शेतातल्या विहिरीत बिबट्या पडला. २ तासांच्या अथक परिश्रमानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांना बिबट्याला पिंजऱ्यात बंद करण्यात यश आले.

कोल्हा गावातील शंकर मारुती राचेवाड यांच्या शेतात रात्री २ वाजताच्या सुमाराला बिबट्या गुरेढोरे बांधलेल्या आखाड्यावर आला. त्याने एका गाईच्या वासराला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. वासराला पंजा मारताच इतर गुराढोरांनी हंबरडा फोडला. त्या आवाजाने शंकर राचेवाड, मारुती राचेवाड जागे झाले. त्यांनी बॅटरीच्या उजेडात पाहिले असता, त्यांना बिबट्या आल्याचे दिसून आले. दोघांनी प्रसंगावधान राखत बिबट्याच्या डोळ्यावर बॅटरीचा तीव्र प्रकाशझोत टाकला. त्यामुळे तो मागे-मागे सरकत गेला व विहिरीत पडला. जेसीबीच्या साहाय्याने पिंजरा एका कोंबडीला बांधून विहिरीत सोडण्यात आला. १२ तास उपाशी असलेल्या बिबट्याने पिंजऱ्यात कोंबडी पाहून तिच्यावर झडप घातली. बिबट्या पिंजऱ्यात जाताच पिंजऱ्याचे दार बंद करण्यात आले. बिबट्याला विहिरीतून बाहेर काढण्यात आले. बिबट्याला पाहण्यासाठी विहिरीभोवती झालेली गर्दी पोलिसांना बळाचा वापर करून गर्दी पांगवावी लागली.
अधिवास बघून सोडण्यात येईल
> कोल्हा गावात शिकार करण्याच्या उद्देशानेच बिबट्या आला होता. मागे जात असताना तो विहिरीत पडला. त्याला पिंजऱ्यात जेरबंद केले आहे. त्याचा अधिवास कोठे आहे याचा शोध घेऊन नंतर त्याला त्या जंगलात सोडण्यात येईल. - सुजय डोडल, उप वन संरक्षक, वन विभाग, नांदेड
बिबट्याच्या हल्ल्यात २ शेतकरी जखमी
जालना | बदनापूर तालुक्यातील चनेगाव शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेतकरी गंभीर जखमी झाले. साहेबराव माणिकराव मुटकळ (५५) व बाळू हिंमतराव निहाळ (२२, दोघे रा.चनेगाव, ता.बदनापूर) अशी जखमींची नावे आहेत.

साहेबराव शेतात काम करत असताना बांधावरील जाळीतून बाहेर येऊन बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला. यात पायाचे लचके तोडून साहेबरावला गंभीर जखमी करण्यात आले. त्याचवेळी टॅक्टर चालवत असलेला बाळू खाली उतरताच बिबट्याने त्याच्याही अंगावर झडप मारली व त्यांना जखमी केले.