आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lets Go Pandari.... Lord Yours Name Always With Me

चला जाऊ पंढरीला .... आणिक काही इच्छा, आम्हां नाही चाड । तुझे नाम गोड पांडुरंगा ।।

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाटोदा - भक्तीला ना वयाचे बंधन ना जात-धर्मांची आडकाठी. विठ्ठलनामाचा जयघोष करत अनेक वारकरी वर्षानुवर्षे अखंडपणे दिंडीत सहभागी होतात. वयाच्या अवघ्या बारा वर्षांपासून नेमाने पंढरपूरला जाणारे गजानन तांबे यांची कहाणी अशीच. अगदी कोवळ्या वयात दिंडीत दाखल झाले. अन् मग दरवर्षी खरिपातील पेरणी उरकली की वारीच्या तयारीला लागायचं हाच शिरस्ता झाला. वयाची पंचाहत्तरी पार केल्यानंतरही त्याच उत्साहाने गजानन तांबे यांची पापले पंढरीकडे वळतात. ‘दिव्य मराठी’च्या प्रतिनिधीने त्यांच्यासोबत बातचीत केली. त्या वेळी त्यांनी अनेक आठवणी सांगितल्या.
ते म्हणतात, बरोबर 63 वर्षांपूर्वी आजोबा शांताराम तांबे यांच्यासोबत नाथांच्या पालखीसोबत पहिल्यांदा पंढरपूरपर्यंत वाटचाल केली. त्यानंतर पाच-सहा वर्षे आजोबांची संगत राहिली.


आम्हा न कळे ज्ञान न कळे पुराण आम्हा ।
वेदांचे वचन न कळे आम्हा ।।
चोखा म्हणे माझा भोळा भाव देव ।
गाईन केशवा नाम तुझे ।।

असे अभंग गात रस्त्याने चालताना ईश्वर चिंतनामध्ये रममाण होत वारक-यांनी चालवलेला अखंड जयघोष माझे मन मोहवून टाकत असे. टाळ-चिपळ्यांचा मधुर आवाज, मृदंगावर पडणारी थाप आणि विठ्ठल-विठ्ठल असा गजर वेडावून टाकत असे. रस्तोरस्ती अनेक ग्रामस्थ दिंडीत सहभागी होत. प्रत्येक गावात प्रवेश करताच ग्रामस्थ आस्थेने सर्वांच्या राहण्याखाण्याची व्यवस्था करत. आजोबांचे बोट धरून दिंडीत दाखल झालेले गजानन तांबे प्रत्येक गोष्ट मनात साठवत असत. पुढे एकट्याने वारी करण्याचा प्रसंग आला. घरातले कुणीच सोबत नाही, दिंडीतील अनेकांची तोंडओळखही नाही. तरी लाडक्या विठुरायाच्या दर्शनाची ओढ हा सर्वांना जोडणारा समान धागा असल्यामुळे मार्ग सुकर होत असे. आपसुकच सर्वांशी ओळख होई अन् प्रवास चुटकीसरशी पार होत असे.


गावोगावी सगळी व्यवस्था दिंडीसोबत टँकर, अनेक सेवेकरी, मोबाइलची सुविधा असं 60 वर्षांपूर्वी काहीही नव्हतं. प्रत्येकासोबत पाण्याची बाटली असायची. चालताना एखादं गाव लागलं की पाण्याच्या बाटल्या भरून घ्यायच्या. रस्त्यातल्या एखाद्या झाडाखाली विसावा घ्यायचा, असेही ते म्हणाले.