आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सूर्याभोवती दिसले पुन्हा तेजोवलय, नांदेड परिसरात पाहायला मिळाले दृश्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर- जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मराठवाड्यात सूर्याभोवती तेजोवलय पाहायला मिळाले होते. शनिवारी त्याची पुनरावृत्ती झाली. लातूर, नांदेड भागात पुन्हा एकदा सूर्याला पडलेल्या वलयाचा वेढा पाहायला मिळाला. मराठवाड्यासारख्या पठारी प्रदेशात खरे तर असे दृश्य दुर्मिळ असते. मात्र, गेल्या दोन-तीन वर्षांत तीन-चार वेळा असे दृश्य पाहायला मिळाले. विशेष म्हणजे असे दृश्य पाहायला मिळालेल्या प्रदेशात पावसाचे प्रमाण कमी असते, अशा नोंदी नांदेडच्या महात्मा गांधी मिशन महाविद्यालयाचे खगोलशास्त्रज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी केल्या आहेत.

लातूर जिल्ह्यात शनिवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास सूर्याभोवती मोठ्या आकाराचे वलय दिसून आले. साधारणपणे दुपारच्या प्रखर उन्हात सूर्याकडे पाहता येत नाही. मात्र, शनिवारी काहीसे ढगाळ वातावरण होते. त्यामुळे उन्हाची तीव्रता कमी होती. त्यामुळे कोणताही चष्मा किंवा दुर्बीण न वापरता वलय पाहिल्याचे अनेकांनी सांगितले. सुमारे तासभर हे वलय कायम होते. त्यानंतर हळूहळू ते पुसट झाले आणि अदृश्य झाले. याबाबत खगोलशास्त्रज्ञ औंधकर यांनी सांगितले, हिमालयासारख्या उंच पर्वतरांगांमध्ये असे वलय दिसते. त्या भागात समुद्रसपाटीपासूनची उंची जास्त असल्यामुळे ढग कमी उंचीवर दिसणे ही साधारण बाब आहे. मात्र, मराठवाड्यासारख्या समुद्रसपाटीपासून ३०० ते ३५० मीटर उंचीवरच्या प्रदेशात असे वलय दिसणे ही दुर्मिळ बाब आहे. मात्र, गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये असे प्रकार वारंवार होताना दिसत आहे. दोन वर्षांपूर्वी औरंगाबाद, गेल्या वर्षी नांदेड, या वर्षी लातूर-नांदेड या भागात सूर्याला कडे पडल्याचे आढळून आले आहे. काही ठिकाणी अनेकांना सूर्याभोवती निळा किंवा लालसर ठिपकाही आढळून आला. मात्र, औंधकर यांच्या मते तो कोणताही ग्रह नाही. केवळ मोबाइल कॅमेऱ्यातून काढलेल्या फोटोंतच हा ठिपका दिसतो. मोबाइल कॅमेऱ्याच्या प्रकारानुसार त्याचा रंग बदलतो. त्याचा संबंध कोणत्या ग्रहाशी जोडू नये, असे ते म्हणाले.

पावसाचे प्रमाण होते कमी?
गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये ज्या-ज्या वेळी सूर्याभोवताली तेजोवलय दिसले त्यानंतरच्या काळात पावसाचे प्रमाण कमी होत गेल्याचे श्रीनिवास औंधकर यांना आढळून आले आहे. दोन वर्षांमध्ये वलय दिसल्यानंतर त्या-त्या भागातील पाऊस कमी झाल्याची नोंद औंधकर यांनी करून ठेवली आहे. जून महिन्यात ११ तारखेला नांदेड-औरंगाबाद परिसरात असे वलय दिसले होते. त्यानंतरचा अभ्यास केला असता मराठवाड्यात जूनच्या पहिल्या आठवड्यात चांगला पाऊस झाला. मात्र, पुढे आजपर्यंत चांगला झालेला नाही.
का दिसते वलय..?
सूर्याभोवतीचे वलय नांदेड जिल्ह्यातही दिसले. याला इंग्रजीमध्ये हालो असे संबोधतात. वातावरणातील सुमारे ६ ते ७ किमी उंचीवर अति विरळ सायरस प्रकारच्या ढगांची निर्मिती झाल्यानंतर व सूर्य डोक्यावर आल्यानंतर सूर्यकिरणे या ढगांवर पडतात. ढगांमधील बर्फाच्या स्फटिकांवर प्रकाश पडल्यावर ते २२ अंशांच्या कोनातून निरीक्षकाकडे वळतात. त्यामुळे सूर्याकडे पाहणाऱ्याला तेथे रंगीत तेजोवलय दिसते. तेजोवलयाच्या आतील बाजूस तांबडा, तर बाहेरील बाजूस हिरवट निळा रंग दिसतो.