आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीड जिल्ह्यात वीज कोसळून चार ठार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धारूर/वडवणी- धारूर व बीड तालुक्यांत शनिवारी दुपारी वादळी वार्‍यासह झालेल्या पावसात वीज कोसळून दोन घटनांमध्ये चौघांचा मृत्यू झाला.
धारूर तालुक्यातील जैतापूर परिसरात वादळी वार्‍यासह पावसास सुरुवात झाली. लिंबाच्या झाडाखाली आर्शयाला सात जण थांबले होते. दुपारी चार वाजता याच झाडावर वीज कोसळली. यात कोंडाबाई माणिक दराडे (45), अंगद ज्ञानोबा दराडे (30), पांडुरंग अंगद दराडे (8) यांचा मृत्यू झाला. दोन शेळ्याही दगावल्या. उषा अंगद दराडे, अनसूया वसंत दराडे, कृष्णा वसंत दराडे, तारामती सुग्रीव दराडे हे गंभीर भाजले. त्यांच्यावर अंबाजोगाईत स्वाराती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

दुसरी घटना बीड तालुक्यातील सुर्डीथोट येथे घडली. मंदाबाई कैलास थोटे (28) आपल्या मुलासमवेत शेतातून घराकडे जात असताना अचानक वीज कोसळली. यात मंदाबाईचा मृत्यू झाला, तर मुलगा सुदैवाने बचावला.

औरंगाबादेत पाऊस
औरंगाबाद- शहर व परिसरात रात्री मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. रात्री साडेअकरानंतर पावसाचा जोर वाढला. उशिरापर्यंत पाऊस सुरू होता.दरम्यान, बीड जिल्ह्यात वडवणी, जालना शहर व बदनापूर तसेच औरंगाबाद जिल्ह्यातील पिशोर परिसरात शनिवारी मान्सूनने जोरदार हजेरी लावली. वडवणीत नदी-नाल्यांना पूर आला. अनेक ठिकाणी वाहतूक खोळंबली. बदनापूर शहर व परिसरासह भोकरदन, मंठा, जाफराबाद, घनसावंगी तालुक्यातील काही भागांत चांगला पाऊस झाला. नांदेड शहर व जिल्ह्यात पावसाने चांगली हजेरी लावली.

मान्सून पुणे, मुंबईत दाखल
पुणे- मान्सून शनिवारी अधिकृतरीत्या पुण्या-मुंबईत दाखल झाल्याचे तसेच तो येत्या 48 तासांत मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र व्यापेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मुंबईत पाऊस दोन दिवस आधीच आला आहे. मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी अनुकूल वातावरण असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. दरम्यान, भांडुपमध्ये काजू टेकडी परिसरात भिंत कोसळून दोघांचा मृत्यू झाला. दोघे जखमी आहेत.