आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महामोर्चाद्वारे लिंगायत समाजाची स्वतंत्र धर्म मान्यतेची मागणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर- लिंगायत धर्माच्या संवैधानिक मान्यतेसाठी रविवारी लातुरात काढण्यात आलेल्या लिंगायत धर्म महामोर्चास अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्रासह  परप्रांतातूनही लिंगायत समाजबांधव या महामोर्चासाठी एकवटल्याचे चित्र रविवारी लातुरात पाहावयास मिळाले. १०० वर्षीय  डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांनी या महामोर्चाचे नेतृत्व केले. 

लिंगायत धर्माला संवैधानिक मान्यता प्रदान करावी, लिंगायत धर्मीयांना धार्मिक अल्पसंख्याक वर्गामध्ये समाविष्ट करावे, राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, सन २०२१ मध्ये होणाऱ्या भारताच्या राष्ट्रीय जनगणनेत लिंगायत धर्माच्या लोकसंख्येची स्वतंत्र नोंद होण्यासाठी सरकारने लोकसंख्या पारपत्रामध्ये विशिष्ट स्वरूपात नोंदीची व्यवस्था करावी , लिंगायत धर्माच्या मूळ कन्नड भाषेतील वचन  साहित्याला मराठीसह इतर भारतीय भाषांमध्ये अनुवाद करण्यासाठी शासनाने स्वतंत्र मंडळ  वा प्रकल्पाची निर्मिती करावी आदी मागण्यांसाठी  हा मोर्चा काढण्यात आला.   या महामोर्चात बंगळुरूच्या प्रथम महिला जगद््गुरु डॉ. माते  महादेवी, भालकीचे डॉ. बसवलिंग पट्टदेवरू, दिल्लीचे चन्नबसवानंद महास्वामी, कुडलसंगम कर्नाटकचे बसवजयमृत्युंजय महास्वामी, कोरणेश्वर  अप्पाजी यांसह  अनेक मान्यवर सहभागी झाले होते. 

लातूरच्या जिल्हा क्रीडा संकुलापासून सुरू झालेला हा महामोर्चा शिवाजी चौक, बार्शी रोडमार्गे नवीन जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. अत्यंत शांत व शिस्तीत निघालेल्या या महामोर्चाने अवघ्या लातूरकरांचे लक्ष वेधून घेतले. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचल्यानंतर उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज म्हणाले की, भारतातील प्रत्येक व्यक्तीला आपल्या धर्माचा सार्थ अभिमान आहे.  लिंगायतांपेक्षा अल्पसंख्याक असणाऱ्या शीख, बौद्ध, जैन, मुस्लिम, ख्रिश्चन धर्मीयांना स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता आहे. मग यापेक्षा बहुसंख्येने असणाऱ्या लिंगायत धर्मालाही स्वतंत्र  संवैधानिक मान्यता मिळावी , या उद्देशाने आज हा महामोर्चा काढण्यात आला आहे. 

धर्माला मान्यता न मिळण्याचे मूळ राजकारणात
या धर्माला मान्यता न देण्याचे कारण नमूद करताना डॉ. शिवलिंग शिवाचार्य म्हणाले की, तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांना  लिंगायत धर्मातील नेते  निजलिंगप्पा  हे प्रमुख प्रतिस्पर्धी होते. निजलिंगप्पांनी नेहरूंना थेट आव्हान दिले होते. त्या वेळी नेहरूंनी लिंगायत धर्मीयांत फूट पाडून  बी.डी. जत्तींना  जवळ केले व  पद  दिले. त्यामुळे ब्रिटिशांच्या काळात मान्यता असलेल्या या धर्माला मान्यतेपासून डावलण्यात आले. लिंगायत समाज केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, पंजाब, ओडिशा, तेलंगण आदी अनेक प्रांतांत असल्याचे त्यांनी सांगितले. 

मंत्रीही सहभागी
या महामोर्चात कर्नाटकचे जलसंधारण मंत्री एम.बी. पाटील, खनिज व विज्ञान मंत्री विनय कुलकर्णी, कर्नाटक एस.टी. महामंडळाचे उपाध्यक्ष  बसवराज गुन्ना यांसह राज्याच्या विविध भागातून  समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले  होते.  त्यांच्यासाठी  जलपान व अल्पोपाहाराची सोयही होती. 
बातम्या आणखी आहेत...