आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुळजापुरात दारूबंदी; नगर परिषदेचा ठराव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुळजापूर - तीर्थक्षेत्र तुळजापूर शहरात पाच किमी परिसरात संपूर्ण दारूबंदी करण्याचा ऐतिहासिक ठराव नगरपालिकेने घेतला आहे. तुळजाभवानी देवीच्या वास्तव्याने पावन तुळजापूरचे दारूमुळे पावित्र्य धोक्यात आल्याचे नमूद करून सर्वप्रथम पुजारी मंडळाच्या वतीने दारूबंदीसाठी पुढाकार घेण्यात आला होता. दैनिक दिव्य मराठीनेही या मागणीला पाठबळ देऊन ठरावासाठी बैठकांना खोडा घालणार्‍यांविरोधात वृत्त प्रकाशित करून या मागणीचा सतत पाठपुरावा केला होता. दरम्यान, सोमवारी झालेल्या विशेष बैठकीत अखेर शहरात दारूबंदीचा ठराव, तसेच माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा पुतळा उभारणीसह २९ विषयांना मंजुरी देण्यात आली.

महिनाभरापूर्वी तुळजाभवानी पुजारी मंडळाच्या वतीने शहरात दारूबंदी करण्याची मागणी करण्यात येऊन यासाठी सतत पाठपुरावा करण्यात आला. त्या वेळी मुख्याधिकारी राजीव बुबणे यांनी पुजारी मंडळाच्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला असला तरी पालिकेतील अनेक नगरसेवकांकडून या मागणीला विरोध होऊ लागला. केवळ या दारूबंदीच्या मुद्द्यावरून महिनाभरात दोन वेळा पालिकेची विशेष सर्वसाधारण सभा स्थगित करण्यात आली. चांगल्या निर्णयासाठी पालिकेतील काही सदस्यांकडून घालण्यात येत असलेल्या खोड्यामुळे सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसबाबतही उलटसुलट चर्चा होऊ लागली होती. या सर्व पार्श्वभूमीवर आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी तुळजापूर पालिकेतील नगरसेवकांना उस्मानाबादेत बोलावून ठराव मंजूर करण्याबाबत सुनावले हाेते. त्यानुसार पालिकेच्या विशेष सभेत दारूबंदीसह विलासराव देशमुख यांचा पुतळा उभारणे व इतर असे २० ठराव मंजूर करण्यात आले.

नियमाच्या पातळीवर निर्णय टिकणार का?
तुळजापूर पालिकेने शहरात दारूबंदीचा ठराव घेतला असला तरी या ठरावाच्या आधारे दारूबंदी लागू करण्याची कोणतीही तरतूद दारूबंदी कायद्यांतर्गत नाही. दारूबंदीसाठी ग्रामीण भागात त्या गावातील मतदार संख्येच्या अथवा महिला मतदारांच्या ५१ टक्के महिलांनी आडव्या बाटलीसाठी मतदान केल्यानंतरच दारूबंदीचा निर्णय लागू होऊ शकतो. यासाठी प्रथम त्या गावातील नागरिकांनी राज्य उत्पादन शुल्क अथवा तालुका, जिल्हा प्रशासनाकडे तशी मागणी करावी लागते. त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने संबंधित गावात अथवा शहरी भागात वाॅर्डामध्ये आडव्या बाटलीसाठी मतदान प्रक्रिया राबवली जाते. परंतु, नगर परिषदेने दारूबंदीचा ठराव घेतल्यानंतर याची अंमलबजावणी करण्याची कोणतीही तरतूद सध्याच्या नियमांत नाही.

वरिष्ठांकडून मार्गदर्शन घेऊन पुढील निर्णय
तुळजापूर नगरपालिकेने दारूबंदीचा ठराव घेतल्याची माहिती कळते. या ठरावावरून शहरात दारूबंदीचा निर्णय घेण्याची कोणतीही तरतूद सध्याच्या नियमांत नाही. तरीही याबाबत कार्यालयाकडे ठराव अथवा निवेदन आल्यास याबाबत वरिष्ठांकडून मार्गदर्शन घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल. -संजय राठोड, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क

काही नगरसेवकांकडून विरोधाचा सूर
दरम्यान,सोमवारच्या बैठकीत दारुबंदीचा विषय येताच कांही नगरसेवकांनी विरोधाचा सूर आळवल्याचे कळते. परंतु, पंडितराव जगदाळे, नागनाथ भांजी, डॉ.स्मिता लाेंढे आदी नगरसेवकांनी दारूबंदीचे समर्थन केले. तसेच कांही महिला नगरसेवकांनी दारुबंदीच्या निर्णयासाठी आग्रही भूमिका मांडल्याने अखेर हा ठराव मंजूर करण्यात आला.

तुळजापुरात १४ परमिट रूम, ५ देशी दारूची दुकाने
तीर्थक्षेत्र तुळजापूर शहरात सध्या देशी दारूची ५ दुकाने आहेत. तसेच २ वाइन शॉप व १२ ते १४ परमिट रूम आहेत. त्याचबरोबर शहराच्या परिसरात सोलापूर, उस्मानाबाद, लातूर व बार्शी मार्गावरही अनेक परमिट रूम असून या सर्वांचा आकडा पाहिल्यास २५ पर्यंत जातो.
बातम्या आणखी आहेत...