लातूर - ‘निवडणुकीच्या काळात हरामाचा पैसा घ्या अन् त्याची दारूही प्या,’ असे विधान करून दारूचा प्रचार करणारे व अनेक महिलांचे संसार उद्ध्वस्त करणा-या प्रवृत्तीला प्रोत्साहन देणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे हे विधान लज्जास्पद आहे, अशी टीका राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी केली. लातूर ग्रामीण मतदारसंघातील बोरगाव काळे येथे त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, गडकरींसारख्या ज्येष्ठ नेत्याने असे विधान करून दारूबाजीला एकप्रकारे प्रोत्साहन दिले आहे.
दारू पिऊन मतदान करा, असे त्यांचे म्हणणेही न पटणारे आहे. दारूने कधी कोणाचे भले झाले आहे का, असा सवाल करून अनेक महिलांचे संसार उद्ध्वस्त करणा-या प्रवृत्तीचा त्यांनी खरपूस समाचार घेतला. या वेळी त्यांनी विलासराव देशमुख यांची आठवणही काढली.