आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोटेगावमध्ये रेल्वे रुळांवर जिवंत डिटोनेटर, तपासणीनंतर रेल्‍वे वाहतूक सेवा सुरळीत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैजापूर - तालुक्यातील रोटेगाव रेल्वेस्टेशन मुख्य परिसरात रेल्वे रुळांच्या मध्यभागी शुक्रवारी सकाळी ९ वाजता एक जिवंत डिटोनेटर आढळल्यामुळे मोठी खळबळ उडाली. औरंगाबादहून आलेल्या बॉम्बशोधक व नाशक पथकाने जिवंत डिटोनेटर जप्त केल्यानंतर रेल्वेस्टेशनपासून दोन्ही बाजूंकडील एक कि.मी. अंतरापर्यंत रेल्वे रुळांची तासभर दोन श्वानपथकांकडून कसून तपासणी करण्यात आली. दरम्यान, कुठलीही संशयित व्यक्ती वा वस्तू नसल्याची खात्री करून रेल्वे वाहतूक सेवा सुरळीत करण्यात आली.

रोटेगाव रेल्वेस्टेशनमधून सकाळी ८ वाजून ४० मिनिटांनी जालना-नगरसोल पॅसेंजर नगरसोलकडे मार्गस्थ झाल्यानंतर गाडीला झेंडी दाखवणारा कर्मचारी राधेश्याम यादव यांना रेल्वे रुळांच्या मध्यभागी संशयित वस्तू पडलेली दिसून आली. याची महिती त्यांनी स्टेशन मास्तर संतकुमार बर्नावाला यांना कळवली.
 
त्यांनी पाहणी केल्यानंतर तातडीने रेल्वे पोलिसांना माहिती दिली. वैजापूरचे पोलिस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी बॉम्बशोधक व नाशक पथक पोहोचेपर्यंत एका टोपलीत डिटोनेटर सावधपणाने टाकून बाजूला करण्याचे धाडस दाखवले. बॉम्बशोधक पथकाने संशयित वस्तूची तपासणी करून ते जिवंत डिटोनेटर असल्याचा खुलासा करून जप्त केले. 

या पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक ए. व्ही. केंद्रे, आर. सी. वऱ्हाडे, एस. एस. दाभाडे, के. एस. घुले, आर. ए. मात्रे, एस. एस. शिंदे, एन. व्ही. ससे,आर. सी. मोरे, एस. व्ही. जिवरग, श्वान पथक रेणो, पुनो यांच्यामार्फत रेल्वे रुळांची एक कि.मी पर्यंत तपासणी केली. या ठिकाणी उपविभागीय पोलिस अधिकारी शरद बर्डे, दहशतवादविरोधी पथक रेल्वे पोलिसांचे सुरक्षा पथकाने भेट देऊन चौकशी सुरू केली आहे.
 
याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी डिटोनेटर जप्त करून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक कांबळे करत आहेत.   दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाने रोटेगाव रेल्वेस्थानकात सुरक्षेसाठी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित न केल्यामुळे डिटोनेटर रुळांपर्यंत कुणी आणून टाकले किंवा त्यांची वाहतूक रेल्वेतून होते का, याचे धागेदोरे सीसीटीव्ही कॅमेरे नसल्यामुळे मिळत नसल्याने पोलिसांपुढे आव्हान ठरले आहे. 
 
रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले    
या घटनेमुळे सुरक्षा यंत्रणेने औरंगाबादहून शिर्डीकडे जाणारी विशाखापट्टणम- शिर्डी एक्स्प्रेस परसोडा रेल्वेस्टेशनवर तासभर सुरक्षेच्या कारणास्तव थांबवली होती. तसेच स्टेशनचा फलाट क्रमांक एक निर्मनुष्य करून पथकाने कसून तपासणीचा सोपस्कार पूर्ण केल्यानंतर रेल्वे वाहतूक  सुरळीत झाली.
बातम्या आणखी आहेत...