आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्जवाटपाची थंडावले, शेतकरी संघटना, जायकवाडी पाणी संघर्ष समिती आक्रमक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
पैठण - पैठण तालुक्यात यंदा नव्याने पाच टक्केही पीक कर्जाचे वाटप झाले नसल्याची बाब समोर आली आहे. पैठणमध्ये जे काही कर्जवाटप झाले ते केवळ प्रगतिशील शेतकऱ्यांनाच झाल्याचा आरोप शेतकरी संघटना, जायकवाडी पाणी संघर्ष समितीने केला आहे.

यंदा तालुक्यात ५० टक्क्यांवर पेरण्या झाल्या आहेत. मात्र, अद्यापही काही शेतकऱ्यांकडे बी-बियाण्याच्या खरेदीसाठी पैसे नसल्याने त्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. बँका कर्ज देत नसल्याने शेतकरी आता खासगी सावकारांकडे चकरा मारत असून पुन्हा शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबला जाणार असल्याचे चित्र तालुक्यात आहे. शासनाने राज्यभरातील शेतकऱ्यांची पूर्ण कर्जमाफी केल्यानंतरही बँकांकडून कर्ज घेण्याचे प्रमाण वाढतच आहे. बँकांची वसुली त्या तुलनेत कमी झाल्याने बँका शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करू लागल्या आहेत. सधन शेतकऱ्यांना एक न्याय व अल्पभूधारक शेतकऱ्यांना दुसरा न्याय असा दुजाभाव केला जात असल्याने शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त होत आहे. बँका शासनाचे आदेश असताना कर्ज देत नाहीत, मग बँका शासनाच्या वरच्या आहेत काय, असा सवाल शेतकरी आबासाहेब मोरे यांनी केला. लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांच्या या प्रश्नाला गांभीर्याने घेत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

बँकांना पीक कर्ज देणे बंधनकारक
मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व बँकांना शेतकऱ्यांना तत्काळ पीक कर्ज देण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या सूचनांना बँकांकडून तिलांजली दिली जात असल्याचे चित्र तालुक्यात आहे. यासंदर्भात बँकांकडे विचारणा केली असता शेतकरी कर्जाची परतफेड करत नाहीत. केवळ कर्जमाफी होण्याची वाट पाहतात. सर्वच शेतकऱ्यांना कर्ज देणे शक्य नसल्याचे काही बँकांनी स्पष्ट केले.

१० जुलै रोजी आंदोलन
अल्पभूधारक शेतकऱ्यांना का म्हणून कर्ज नाकारता, याचा जाब विचारण्यासाठी बँकांसमोर शुक्रवारी (दि. १०)आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती शेतकरी जयाजी सूर्यवंशी यांनी दिली.