आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विरोधकांना उत्तर, सरकारचे राज्यभरात कर्जमुक्ती सोहळे! मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शुभारंभ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राज्य सरकारने घोषित केलेल्या ३४ हजार कोटींच्या कर्जमाफीला अखेर मुहूर्त मिळाला आहे. एेन दिवाळीत बुधवारपासून ( दि. १८) शेतकऱ्यांचा सातबारा काेरा हाेणार असून पहिला टप्प्यात राज्यभरातील तब्बल १० लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार अाहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कर्जमाफीच्या पहिल्या टप्प्याचा शुभारंभ हाेणार अाहे. 

कर्जमाफीच्या मुद्द्यावर धारेवर धरणाऱ्या, ‘लबाडाचं अावताण’ म्हणून भाजप सरकारची हेटाळणी करणाऱ्या विराेधकांना चाेख प्रत्युत्तर देण्यासाठी कर्जमाफीचा राज्यभर ‘सरकारी साेहळा’ साजरा करण्याची तयारीही फडणवीस सरकारने केली अाहे. मुंबईत बुधवारी हाेणाऱ्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राज्यभरातील शंंभर शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचे प्रमाणपत्र देण्यात येईल. इतकेच नव्हे तर सदरा, टोपी, साडी-चोळी देऊन त्यांचा सहकुटुंब सत्कारही करण्यात येणार अाहे. तसेच राज्यातील  प्रत्येक तालुकानिहाय पाच शेतकऱ्यांचा संबंधित जिल्ह्यांच्या ठिकाणी पालकमंत्र्यांच्या हस्तेच याच पद्धतीने सन्मान करून त्यांना कर्जमुक्तीचे प्रमाणपत्र दिले जाईल.
 
> मुंबईत १०० शेतकऱ्यांचा सदरा, साडी, चोळी देऊन सत्कार
 
अशी मिळेल कर्जमाफी...
सरकारच्या वतीने कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांकडून अाॅनलाइन अर्ज मागवण्यात अाले अाहेत. त्यांची छाननी करून पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात दीड लाखापर्यंतची रक्कम सरकारकडून जमा करण्यात येणार अाहे. शेतकऱ्यांना थेट पैसे किंवा चेक मिळणार नाहीत. त्यांना केवळ कर्जमुक्त झाल्याचे प्रमाणपत्र संबंधित बँकांकडून दिले जाईल.
 
महिनाभरात सर्वांनाच लाभ  
दिवाळीच्या मुहूर्तावर बुधवारी राज्यातील कर्जमाफीच्या पहिला टप्प्याला सुरुवात हाेत अाहे. शेतकऱ्यांना दिलेला शब्द अाम्ही पाळला असून पुढील महिनाभरात सर्वच लाभार्थी शेतकऱ्यांचा सातबारा काेरा केला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. जालना येथे अायाेजित कार्यक्रमात ते बाेलत हाेते.
 
बोगस शेतकरी रेड झोनमध्ये; कर्जमाफी तात्पुरती स्थगित
तपासणीत बोगस नावाने शेतकरी कर्ज काढणाऱ्यांना रेड झोनमध्ये टाकून त्यांची कर्जमाफी तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. याचबरोबर प्रत्यक्ष शेतकरी असलेल्यांची माहिती योग्य असल्याचे तपासून घेण्यात आले आहे. या तपासणीमुळेच कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ होण्यास विलंब लागत असल्याची माहिती सहकार विभागातील सूत्रांनी दिली आहे. 
 
पहिल्या टप्प्यातील यादी तयार 
सहकारमंत्र्यांच्या अादेशाने मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शुक्रवार, शनिवार व रविवारी युद्धपातळीवर काम करत पहिल्या टप्प्यातील यादी तयार केली. सरकारी अधिकारी व लोकप्रतिनिधींच्या नावावरील शेतीची माहिती घेऊन ती माहिती आधार कार्डाशी लिंक करून कर्जमाफीची खातरजमा करण्यात आली.
 
कर्जमाफीची २ वर्गांत विभागणी 
{दीड लाखाच्या वर कर्ज घेतलेले ८ लाख शेतकरी आहेत. {३६ लाख शेतकरी हे दीड लाखाच्या आत कर्ज घेतलेले आहेत. {दीड लाखाच्या आत कर्ज घेतलेल्या ३६ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीत प्राधान्य दिले जाणार आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात १० लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ मिळणार आहे.
 
२००९ मधील बोगस शेतकऱ्यांकडून १०० कोटी वसूल 
२००९ च्या कर्जमाफीत मुंबईत स्थायिक असूनही शेतकऱ्यांच्या नावाने बोगस कर्ज काढून ते माफ करून घेण्याचे प्रकार झाले होते. मुंबईतील काही जणांकडून १०० कोटींच्या वर दिलेली कर्जमाफी या सरकारने वसूल केली आहे.
बातम्या आणखी आहेत...