आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोळशाच्या तुटवड्यामुळे राज्यात काळोख; खुल्या बाजारातून 395 मेगावॅट वीज खरेदी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ/बीड-  राज्यातील महानिर्मितीच्या वीज केंद्रांतील कोळशाचा तुटवडा व  कृषी पंपांसाठी वाढती वीज मागणी यामुळे राज्यात आपत्कालीन भारनियमन अाेढवले अाहे. मंगळवारी तिसऱ्या दिवशीही महावितरणची वीज मागणी १४ हजार ८००, तर राज्याची मागणी १९ हजार मेगावॅटदरम्यान असल्याने महावितरणच्या ई ते जी या ग्रुपवरील फीडरवर भारनियमन केले जात अाहे.  पितृपक्षातील उन्हामुळे पिकांना पाणी देण्यासाठी पावसाळ्यात बंद असलेल्या वीजपंपांचा वापर सुरू झाला. त्यामुळे विजेची मागणी वाढली. याच दरम्यान महानिर्मितीच्या केंद्रांना कोळशाच्या टंचाईला सामोरे जावे लागत आहे. यामुळे राज्याची वीज मागणी अधिक आणि पुरवठा कमी, अशी स्थिती निर्माण झाली. राज्याला महानिर्मितीकडून सात हजार मेगावॅट व खासगी वीजनिर्मिती उद्योगांकडून ३ हजार ९४५ मेगावॅट विजेचा पुरवठा होणे अपेक्षित आहे. मात्र, कोळसा टंचाईमुळे महानिर्मितीकडून केवळ ४ हजार ५००, तर खासगी क्षेत्रातील वीजनिर्मिती कंपन्यांकडून (अदानी, मे. एम्को व सिपत) केवळ २ हजार ३६० मेगावॅट विजेचा पुरवठा होत आहे. अर्थात १० हजार ९४५ मेगावॅट पुरवठ्याचे नियोजन असताना केवळ ६ हजार ८६० मेगावॅट पुरवठा असल्याने ४ हजार ८५ मेगावॅट विजेची तूट निर्माण झाली आहे. 
 
हिंगोली येथे तीन तास भारनियमन
वीज कंपनीच्या वतीने जिल्ह्यात आज ठिकठिकाणी तीन तास भारनियमन करण्यात आले. सकाळी ११ ते दुपारी २, दुपारी २ ते ५ आणि दुपारी ५ ते रात्री ८ या काळात हे भारनियमन करण्यात आले. वीज कंपनीच्या वतीने सोमवारीही एक-एक तासाचे भारनियमन करण्यात आले होते. या भारनियमनामुळे जिल्ह्यात दैनंदिन कामकाजावर परिणाम झाला. दिवसभर भारनियमन केल्यावर रात्री मात्र वीजपुरवठा सुरळीत केला गेल्याने किमान रात्री तरी नागरिकांवर अंधारात चाचपडण्याची वेळ आली नाही.
 
 
विजेच्या लपंडावाने उस्मानाबादकर हैराण
उस्मानाबाद शहरासह ग्रामीण भागात मंगळवारी(दि.१२) दिवसभर विजेचा लपंडाव सुरू होता. आठवड्यापासून प्रचंड उकाडा वाढल्याने तसेच विजेचा खेळखंडोबा होत असल्याने उस्मानाबादकर हैराण झाले. उस्मानाबाद शहरात सकाळी चार तास वीज गायब होती. मात्र, महावितरणच्या अधिकाऱ्यांना वीज का गेली, याचा पत्ताच नव्हता.  महिनाभरापासून दिवसभरात दहा-वीस मिनिटे वीज जाण्याचे प्रमाण वाढले आहे. मंगळवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास  अर्ध्या शहरातील वीज गायब झाली. दुपारी दोन वाजता वीज आली; मात्र पुन्हा सायंकाळी संपूर्ण शहरातील वीज गायब झाली. यासंदर्भात महावितरणच्या अधिकाऱ्यांना विचारल्यानंतर वीज कशासाठी गेली, याचे कारणही सांगता आले नाही. 
 
बीड जिल्ह्यात सरासरी पाच तास भारनियमन
बीड जिल्ह्यात  सरासरी पाच तासांचे भारनियमन लागू करण्यात आले आहे. यासाठी नऊ ग्रुप तयार करण्यात आले आहेत.  जिल्ह्याला १६० मिलियन युनिट विजेची गरज लागते. परंतु सध्या पुरवठा कमी होऊ लागला असून वीज कंपनीला ही तूट भरून काढण्यासाठी भारनियमनाशिवाय पर्याय राहिलेला नाही. जिल्ह्यात घरगुती, कृषी, औद्योगिक, व्यापारी असे मिळून ४ लाख ९ हजार ६८९ वीज ग्राहक आहेत. यामध्ये एकट्या घरगुती ग्राहकांची संख्या २ लाख एवढी आहे. विजेच्या तुटवड्यामुळे जिल्ह्यातील बीड व अंबाजोगाई या दोन विभागांत सध्या पाच तासांचे भारनियमन करण्यात येत आहे. सध्या राज्यातील वीजनिर्मिती केंद्रांना कोळशाचा तुटवडा असून काही ठिकाणी माती मिश्रित कोळसा येत आहे. पावसामुळे मजुरांना कोळसा काढणे कठीण झाले आहे.  ही परिस्थिती आपतकालीन आहे, असे बीडचे अधीक्षक अभियंता अजिनाथ सोनवणे यांनी सांगितले.
 
नांदेड शहरात सव्वासहा तासांचे भारनियमन
 नांदेड शहर व परिसरातील काही भागात सव्वासहा  तर ग्रामीण भागात आठ तासांचे भारनियमन करण्यात येत आहे. हे भारनियमन सात सप्टेंबरपासूनच करण्यात येत आहे.  सध्या उन्हाळ्यासारखे ऊन पडत असल्याने भारनियमनाने नागरिक त्रस्त झाले आहेत.  नांदेड शहरालगत असलेल्या किवळा व गोपालचावडी या भागात सकाळी, दुपारी व सायंकाळी असे मिळून सव्वासहा तास भारनियमन करण्यात येत आहे. गोपाळचावडीचा काही भाग एमआयडीसीमध्ये येतो. नांदेड शहरात सकाळी सहा ते साडेनऊ व दुपारी साडेअकरा ते तीन या वेळेत व सकाळी साडेनऊ ते दुपारी एक व दुपारी तीन ते सायंकाळी साडेसहा या वेळेत शहरातील वेगवेगळ्या भागात मिळून सात तासांचे भारनियमन करण्यात येत आहे.
 
लातूरमध्ये सध्या भारनियमन नाही
 वीज खरेदी करारानुसार सध्या महावितरणला मिळणाऱ्या विजेच्या मागणीमध्ये तुटवडा जाणवत आहे. महावितरणला कमी वीज मिळत असल्यामुळे साहजिकच वीजपुरवठ्यावर परीणाम होणार आहे. कमी वीज मिळाल्यास जी आणि एफ या गटातील फीडरवर तात्पुरते अर्ध्या ते तासाभराचे भारनियमन केले जात आहे. कमी वीज मिळत गेल्यास हे भारनियमन एफ, ई, डी गटातील फीडरपर्यंत येऊ शकते. लातूर शहर, लातूर एमआयडीसह जिल्ह्यातील बहुतांश शहरी भागातील अत्यल्प फीडर जी, एफ, ई गटांमध्ये समाविष्ट होतात.त्यामुळे लातूर शहर, एमआयडीसी भागात भारनियमन सध्या तरी केले जात नाही, अशी माहिती महावितरणचे अधीक्षक अभियंता सचिन तालेवार यांनी दिली.
बातम्या आणखी आहेत...