आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगदी पिकांच्या उत्पन्नात निम्म्यापेक्षा अधिक घट, ५५ अब्ज ४५ कोटींचे नुकसान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
करमाड - या वर्षी उशिरा झालेल्या व अपु-या पावसामुळे मराठवाडा विभागातील खरीप पिकांची उत्पादकता पन्नास टक्क्यांपेक्षा कमी झाली आहे. त्यामुळे नगदी पिके समजल्या जाणा-या सोयाबीन, मका व कापूस या पिकांमध्ये ५५ अब्ज ४५ कोटी रुपयांचे नुकसान सोसावे लागणार आहे.
मराठवाड्यात सरासरी ७७९ मि. मी. पर्जन्यमान असून, ऑक्टोबरअखेरपर्यंत ४१२.९२ इतके म्हणजेच केवळ ५३ टक्के पर्जन्यमान झाले. गतवर्षी सरासरीच्या १०९.९८ टक्के म्हणजेच ८५४.३७ मि. मी. इतका पाऊस झाला होता. मागील वर्षी सर्वाधिक पर्जन्यमान हिंगोली जिल्ह्यात १२०० मि. मी. तर सर्वात कमी ६७१ मि. मी. पर्जन्यमान बीड जिल्ह्यात झाले होते. या वर्षी आतापर्यंतचे सर्वाधिक पर्जन्यमान ६२.५३ टक्के औरंगाबाद जिल्ह्याची नोंद असून सर्वात कमी पर्जन्यमान ४५.४ टक्के हिंगोली जिल्ह्यात झाले आहे. मराठवाड्यात खरिपाची पेरणी करणारी ५६९७ गावे आहेत. त्यात सर्वाधिक गावांची संख्या नांदेड जिल्ह्यात आहे.
मागील दोन वर्षांपासून मराठवाड्यातील शेतकरी दुष्काळी छायेत वावरत आहेत. या वर्षीदेखील दुष्काळी चटके सहन करण्याची वेळ शेतक-यांवर आली आहे. या वर्षी तब्बल दीड महिना पाऊस उशिराने पडल्यामुळे पेरण्या उशिराच झाल्या आहेत. त्यामुळे पावसाचा मध्येच पडलेला खंड यामुळे पिके हातची गेली आहेत. कृषी विभागाच्या अंदाजानुसार खरीप पिकाच्या उत्पन्नामध्ये पन्नास टक्क्यांपेक्षाही जास्त घट येणार आहे. नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली, बीड या जिल्ह्यात सर्वात जास्त सोयाबीनचे पीक घेतले जाते. मागील पाच वर्षांची सरासरी गृहीत धरल्यास या वर्षी हेक्टरी १० क्विंटल सोयाबीनचे पीक अपेक्षित होते. परंतु अपु-या पावसामुळे या पिकात पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त घट झाली आहे. अशीच अवस्था मका पिकाची झाली आहे.
औरंगाबाद, जालना जिल्ह्यात मका पीक घेणाऱ्या शेतक-यांना सर्वाधिक नुकसान सहन करावे लागले आहे. मराठवाडा विभागात १७ लाख ३३ हजार ६०२ हेक्टरवर कापसाचे पीक घेतले जाते. बागायत व जिरायत मिळून हेक्टरी सरासरी ९ क्विंटल उत्पादन कृषी विभागाने गृहीत धरले आहे. परंतु कृषी विभागाच्या अपेक्षेनुसार शेतकऱ्यांच्या हाती कपाशीचे फक्त ४५ टक्के इतकेच उत्पन्न पडेल अशी शक्यता निर्माण झाली आहे. खरीप पिकाची उत्पादकता घटली असून परतीच्या पावसाने पाठ फिरवल्यामुळे ऑक्टोबरअखेर मराठवाडा विभागात रब्बीच्या फक्त १७.३८ टक्के पेरण्या झाल्या आहेत. सरकारची पैसेवारीसंबंधी अनिश्चितता निर्माण झाली आहे.