आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाड्या रद्द झाल्याने रेल्वेचे 62 लाखांचे नुकसान; फुकट्यांना 35 हजारांचा दंड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड- दक्षिण मध्य रेल्वे विभागाच्या वतीने १६ ते ३१ ऑगस्ट दरम्यान राबवण्यात आलेल्या स्वच्छता पंधरवड्यात रेल्वे स्टेशन व रेल्वेगाड्यांमध्ये घाण करणाऱ्या ३२५ जणांकडून ३५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.  तर २५ ते ३१ ऑगस्ट दरम्यान पावसामुळे रेल्वेगाड्या रद्द झाल्याने रेल्वेचे ६२ लाख रूपयांचे नुकसान झाले, अशी  माहिती दक्षिण मध्य रेल्वेचे डीआरएम डॉ. ए. के. सिन्हा यांनी यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना दिली.  

रेल्वे विभागाच्या वतीने राबवण्यात आलेल्या स्वच्छता पंधरवड्याची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी दक्षिण मध्य रेल्वेच्या वरिष्ठ डीसीएम नेहा रत्नाकर, डीएमई सत्यनारायणा, स्टेशन मास्तर सूर्यवंशी आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.  सिन्हा म्हणाले की, या स्वच्छता पंधरवड्यात १६ दिवसांत आठ वेगवेगळे उपक्रम राबवण्यात आले. यामध्ये जवळपास ५० अधिकारी व ५०० कर्मचारी सहभागी झाले होते. या अभियानात प्रवाशांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात आले. शिवाय रेल्वेतील पॅन्ट्री कार व कॅन्टिनमध्ये देण्यात येणाऱ्या खाद्य पदार्थांचीही तपासणी करण्यात आली. विभागातील ८३ रेल्वे स्टेशनवर स्टीलच्या काळ्या व हिरव्या रंगाच्या कचरा कुंड्या (डस्ट बीन) लावण्यात आल्या आहेत. हे स्वच्छता अभियान केवळ १५ दिवसच नाहीतर आता ३६५ दिवस राबवण्यात येणार असल्याचेही सिन्हा यांनी सांगितले. 

मुंबईत झालेली रेल्वेची दुर्घटना व त्यानंतर झालेल्या पावसामुळे देवगिरी, नंदीग्राम यासारख्या गाड्या २५ ते ३१ ऑगस्ट या दरम्यान रद्द करण्यात आल्या. या गाड्या रद्द केल्याने रेल्वेचे ६२ लाख रुपयांचे नुकसान झाले.   रेल्वेमध्ये असलेल्या अनधिकृत विक्रेत्यांना यापूर्वी २०० ते ३०० रुपये दंड आकारून सोडून दिले जायचे. आता अशा विक्रेत्यांना सुमारे दोन हजार रुपये दंड आकारण्याचा प्रस्ताव आहे. याबरोबरच एकच विक्रेता पुन्हा पुन्हा असा गुन्हा करत असेल तर त्याच्यासाठी जबर दंड व शिक्षेची तरतूद करणार असेही सिन्हा म्हणाले. 

सुरक्षित रेल्वे प्रवासाला प्राधान्य
सततच्या रेल्वेच्या दुर्घटनांच्या अनुषंगाने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना डीआरएम म्हणाले, की आमचे ध्येय सुरक्षित रेल्वे प्रवासाकडे आहे. स्वच्छता ही दुय्यम आहे. मागील तीन वर्षांचा आढावा घेतला असता दक्षिण मध्य रेल्वे विभागात २०१५ मध्ये ६, २०१६ मध्ये ४ व २०१७ मध्ये १ अशा ११ वेळा रेल्वे रूळांवरून घसरल्याच्या घटना घडल्या आहेत, जे प्रमाण अगदी नगण्य आहे. असे  ते म्हणाले.  
बातम्या आणखी आहेत...