माजलगाव - अनैतिक संबंधांतून जन्मलेल्या बालिकेचा गळा दाबून खून केल्याच्या आरोपावरून धारूर येथील प्रियकर-प्रेयसीला माजलगावचे अतिरिक्त सत्र जिल्हा न्यायाधीश एम.व्ही.मोराळे यांनी बुधवारी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.
धारूरच्या ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरात आशाबाई बनसोडे (२४╣) तिच्या आईसोबत राहत होती. राजाराम बापूराव धोत्रे याच्याबरोबर तिची ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाल्याने राजाराम याने आशाबाईला केज येथे किरायाने खोली करून दिली. राजारामने अनैतिक संबंध ठेवल्याने तिला दिवस गेले. दरम्यान, आशाबाईची प्रसूती अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद वैद्यकीय महाविद्यालयात करण्यात आल्यानंतर तिने मुलीला जन्म दिला. रुग्णालयातून सुटी मिळाल्यानंतर राजाराम याने धारूर येथील आशाबाईची आई सुशीलाबाई बनसोडे यांच्या घरी मुलीला आणले. या मुलीला कोण सांभाळणार यावरून आशाबाई व राजाराम यांच्यात वाद झाला. दोघांत भांडणे होऊन यातच नवजात मुलीचा
गळा दाबून खून करण्यात आला.
दोघांनी घराच्या पाठीमागील जागेत मुलीचा मृतदेह पुरला. या प्रकाराची माहिती खब-याने तत्कालीन पोलिस निरीक्षक अंगद सुडके यांना ६ फेब्रुवारी २०१३ रोजी दिली. सुडके यांनी तहसीलदार महेश परांडेकर यांना घटनास्थळी बोलावून घेतल्यानंतर बालिकेचा मृतदेह काढण्यात आला. वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजित लोमटे, डॉ.बनसोडे यांनी मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून बालिकेचा गळा दाबून खून करण्यात आल्याचा अहवाल दिला.
धारूर ठाण्यात गुन्हा
प्रियकर व प्रेयसीने तीन दिवसांच्या बालिकेचा गळा दाबून खून केल्याप्रकरणी पोलिस निरीक्षक अंगद सुडके यांनी धारूर ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून आशाबाई बनसोडे व राजाराम धोत्रे या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना अटकही केली. या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
तहसीलदार, पीएसआयचे जबाब
धारूरचे तत्कालीन तपास अधिकारी अंगद सुडके, तहसीलदार महेश परांडेकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजित लोमटे व डॉ.बनसोडे यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्याने न्यायाधीश एम.व्ही.मोराळे यांनी आशाबाई व राजाराम या दोघांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा व ५०० रुपये दंड त्याचबरोबर कलम २०१ अन्वये तीन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीने सरकारी वकील बी. बी. गित्ते यांनी बाजू मांडली.