आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थिनींच्या खिचडीत मृत पाल!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैजापूर - शहरातील जिल्हा परिषदेच्या मुलींच्या प्रशालेत विद्यार्थिनींना शुक्रवारी दुपारी देण्यात आलेल्या खिचडीत मृत अवस्थेत पाल आढळून आली. या प्रकारामुळे हादरलेल्या शिक्षकांनी तातडीने 70 विद्यार्थिनींना वैद्यकीय उपचारासाठी वैजापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी सर्वांची तपासणी करून कोणालाही खिचडीमुळे विषबाधा झाली नसल्याचे सांगितल्यावर शिक्षकांचा जीव भांड्यात पडला.

जिल्हा परिषद मुलींच्या हायस्कूलमध्ये इयत्ता पाचवी ते आठवीच्या 70 विद्यार्थिनींना दुपारी 1 ते 2 या मधल्या सुटीच्या काळात शाळेने नेमलेल्या बचत गटामार्फत भोजनासाठी खिचडीचे वाटप करण्यात आले होते. खिचडीचे वाटप केल्यानंतर एका मुलीच्या ताटात मृत पाल आढळून आल्याने शाळेत गोंधळ उडाला. विद्यार्थिनींनी तत्काळ हा प्रकार शाळेचे मुख्याध्यापक एस. आर. धुरवे यांना सांगितल्यानंतर त्यांनी तातडीने सर्व 70 विद्यार्थिनींना उपचाराकरिता उपजिल्हा रुग्णालयात आणले. मात्र सध्या डॉक्टरांचा संप सुरू असल्याने या सर्व विद्यार्थिनींची तपासणी आयुर्वेदिक विभागाच्या डॉक्टर शीतल सोनवणे यांनी केली. तपासणीनंतर एकाही विद्यार्थिनीस खिचडी खाल्ल्यामुळे कुठलाही अपाय झाला नसल्याचे त्यांनी सांगितले.

बचत गटास नोटीस बजावणार
कन्या शाळेला 1 जुलैपासून शालेय पोषण आहार योजनेची खिचडी वाटप करण्याचे काम दयासागर बचत गटातर्फे करण्यात येते. खिचडीत पाल आढळल्याने शाळा बचत गटाला नोटीस बजावणार असल्याचे मुख्याध्यापक एस. आर. धुरवे यांनी सांगितले. पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी व मनसेचे तालुका सचिव कल्याण दांगोडे यांना हा प्रकार समजल्यानंतर त्यांनी उपजिल्हा रुग्णालयात येऊन विद्यार्थिनींच्या प्रकृतीची विचारपूस केली.

शाळा प्रशासनावर कारवाईची मागणी
शहरातील कन्या शाळेत ग्रामीण भागातून शिक्षणासाठी येणाºया मुलींची संख्या अधिक आहे. शुक्रवारी शाळेत पोषण आहाराच्या खिचडीत मृत पाल आढळून आल्याने विद्यार्थिनींच्या पालकवर्गाने शालेय प्रशासनावर नाराजी व्यक्त करत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.