आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरगुती गॅसची बचत; अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा प्रकल्प

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी - दैनंदिन वापराच्या घरगुती गॅसमध्ये (एलपीजी) एका किटद्वारे बचत करणारा प्रकल्प येथील शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या अंतिम वर्षाच्या चार विद्यार्थ्यांनी तयार केला आहे. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या प्रकल्पातील किटच्या आधारे वर्षभरात दोन सिलिंडरची बचत करता येईल, असा दावा या विद्यार्थ्यांनी केला आहे.

शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या अंतिम वर्षाचे यश घोडके, गजानन जगताप, भगवान इंगळे, ओम घेवारे या चार विद्यार्थ्यांनी केलेल्या संशोधनातून ही किट विकसित केली आहे. दैनंदिन वाढणारी ऊर्जेची गरज लक्षात घेता, नवीन संशोधन करणे गरजेचे आहे. जैविक ऊर्जेत पेट्रोल, डिझेल व एलपीजी यांचा साठा दिवसेंदिवस संपत चालला आहे. त्याचे संवर्धन करणे गरजेचे आहे, ही बाब लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी हा प्रकल्प हाती घेतला.

दैनंदिन घरगुती वापरातील एलपीजी टँक आणि शेगडी यांच्यामध्ये एक अतिरक्त दबावयुक्त हवेच्या टाकीद्वारे हवा आणि एलपीजी यांचे योग्य प्रमाणात मिश्रण करून ते शेगडीला पाठवण्यात आले. त्यासाठी एक हवेची टाकी व किट तयार करण्यात आली आहे. ही किट वापरल्यास कुठल्याही प्रकारचा धोका होणार नाही, असे यंत्र या किटमध्ये वापरले गेले आहे. सामान्य माणसाला अगदी सोप्या पद्धतीने ही किट वापरता येईल, याची काळजी घेण्यात आली आहे. जर एका कुटुंबाला वर्षाला १२ सिलिंडर लागत असतील तर ही किट वापरल्यास वर्षाला १० सिलिंडर लागतील. दोन सिलिंडरची वर्षाला बचत होईल, यामुळे सामान्य माणसाला वाढत्या महागाईवर मातही करता येईल, असे या विद्यार्थ्यांनी म्हटले आहे.

महाविद्यालयाचे प्राचार्य बालाजी बच्चेवार, प्रा. जयकुमार मुळे, प्रा. भगवान शिंदे यांच्यासह विद्यार्थ्यांनी या किटसंदर्भातील माहिती सोमवारी पत्रकारांना दिली.
बातम्या आणखी आहेत...