बीड - धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात आरक्षण देण्याच्या भूमिकेला राष्ट्रवादीचे नेते तथा आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचडांनी विरोध केल्याने बीडमध्ये राष्ट्रवादीचेच असलेले यशवंत सेना धनगर समाजाचे जिल्हाध्यक्ष भारत सोन्नर यांनी जोडे मारो आंदोलन केले.
धनगर समाजाला अनुसूचित जमातीत आरक्षण देण्याची धनगर समाजाची अनेक दिवसांची मागणी आहे. यासाठी वेळोवेळी आंदोलन करण्यात आल्याने शासनाने याची दखल घेत धनगर आरक्षणाचा मुद्दा पावसाळी अधिवेशनादरम्यान चर्चेला उपस्थित केला. आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड यांनी धनगर आरक्षणाला विरोध केला व आरक्षण दिल्यास सरकारच्या विरोधात जाण्याची धमकी यशवंत सेना धनगर समाज संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भारत सोन्नर यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पिचड यांच्या पुतळ्याला भंडारा फासून जोडे मारो आंदोलन करण्यात आले.
या दबावाला बळी पडून जर शासनाने धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा बाजूला ठेवला तर आघाडीची बिघाडी करण्यासाठी धनगर समाज सज्ज असल्याचा इशारा भारत सोन्नर यांनी दिला.