आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औंढ्यात स्वत: चिता रचून महाराजांची अग्निसमाधी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंगोली - औंढा-हिंगोली मार्गावरील सुरेगाव पाटीजवळील महादेव मंदिराचे महाराज विठ्ठलराव यशवंतराव पोले (६०) यांनी मंदिरातच स्वत:ची चिता रचून सकाळी ५.३० च्या सुमारास जिवंत अग्निसमाधी घेतली. सकाळी सहाच्या सुमारास उघडकीस आलेल्या या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दहा वर्षांपासून हनुमान भक्त महाराज म्हणून विठ्ठल महाराज औंढा भागात धार्मिक कार्यात सक्रिय होते. दोन वर्षांपूर्वी त्यांनी वानप्रस्थ स्वीकारून गृहत्याग केला. येहळेगाव व सुरेगाव दरम्यानच्या तुर्क नदी नावाच्या ओढ्याच्या काठावरील
हनुमान मंदिरातच ते राहू लागले. भक्तांच्या अार्थिक सहकार्यातून, दान-धर्मातून त्यांनी दीड वर्षापूर्वीच छोटेखानी पक्के मंदिरही बांधले.

भडकलेल्या चितेत महाराज : शनिवारी पहाटे काही जणांना मंदिरातून धुराचे लोट दिसले. हळूहळू सुरेगावसह परिसरतील भक्त मंदिराकडे धावले. मंदिरात मोठी लाकडे ढणढण जळताना लोकांना दिसली. त्यावर विठ्ठल महाराजांच्या देहाचा कोळसा होत असताना या भक्तांनी पाहिला. ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीवरून औंढा पोलिस ठाण्याचे पीआय डॉ. गणपत दराडे पोलिस ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. याबाबत औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पहाटेपासूनच पूजा-अर्चा
सुरेगाव ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, विठ्ठल महाराज पहाटे चार वाजता धार्मिक विधीसाठी तयार होत असत. दोन वर्षांपासून त्यांची ही दिनचर्या कायम होती. मंदिराजवळील लाकडे जमवून सव्वापाचच्या सुमारास महाराजांनी अग्निसमाधी घेतली असावी, असा अंदाज आहे.

शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त
सुरेगाव येथील रहिवासी विठ्ठल महाराजांना एक मुलगा आणि मुलगी आहे. आर्थिक स्थिती चांगली असतानाही सांसारिक सुखाचा त्याग करून त्यांनी
दोन वर्षांपूर्वी वानप्रस्थ केला आणि घर सोडले. महाराजांनी कोणताही आजार नव्हता. त्यांनी नश्वर देहाचा त्याग करण्याच्या हेतूनेच अग्निसमाधीचा निर्णय घेतला असल्याची शक्यता आहे.
- अॅड. प्रदीप पोले, ग्रामस्थ, सुरेगाव.
... ते घरी आलेच नाहीत
विठ्ठलराव महाराज यांच्या सुरेगाव येथील समवयस्क मित्रांनुसार त्यांना कोणतेही व्यसन नव्हते. गृहत्याग करून वानप्रस्थ स्वीकारल्यावर ते एकही दिवस घरी आले नाहीत. त्यांनी घरच्यांना नातेवाईकही मानले नाही. गावचे चेअरमन बाबासाहेब पोले यांनी सांगितले, की त्यांनी कधीही अशा समाधीबाबत वाच्यता केली नव्हती. देह नश्वर आहे, आत्मा अमर आहे यावर मात्र ते नेहमीच बोलत.
पैठण तालुक्यातही घेतली होती अशीच अग्निसमाधी
पैठण तालुक्यातील वडजी येथील १९ वर्षीय कृष्णा भांड यांनी ५०१ अभंग लिहीत स्वत:चे सरण रचून सन २००६ मध्ये अग्निसमाधी घेतली होती. आपल्या शेतात कार्तिकी एकादशीला जिवंत समाधी घेतल्यानंतर या समाधी स्थळाला तीर्थक्षेत्राचे स्वरूप आले आहे.
बातम्या आणखी आहेत...