आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra Assembly Election 2014 News In Marathi, Divya Marathi

प्रचार थंडच, बाजारपेठ ठप्प

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - निवडणूक म्हटलं की धामधूम, कार्यकर्त्यांची मौज आणि पैशांची उधळण आलीच. मात्र, निवडणूक २१ दिवसांवर आली तरी या वेळी असे चित्र दिसत नाही. महायुती आणि आघाडीचे घोडे समझोत्यामुळे जास्त दिवस अडकल्यामुळे निवडणुकीची "दिवाळी’ करणा-यांची अडचण झाली आहे. दुसरीकडे पितृपक्ष पंधरवडा आल्यामुळे अर्ज भरू पाहणा-या इच्छुकांची गोची झाली. निवडणुकीला रंग येत नसल्याने गुंतवणूक केलेले प्रचार साहित्य विक्रेते, फटाके व्यावसायिक, हॉटेल चालक अडचणीत आले आहेत.

निवडणुकीमध्ये राजकीय पक्षाच्या पदाधिका-यांप्रमाणेच कार्यकर्त्यांसह निवडणुकीवर अवलंबून असणा-या व्यावसायिकांची चंगळ असते. झेंडे, गमचे, बिल्ले, होर्डिंग्ज, स्टेज साहित्य, स्पीकर, मंडप, चारचाकी मोटारी ही प्रचाराची प्रमुख व्यवस्था असते. प्रचार साहित्यावर लाखो रुपये खर्च केले जातात. त्यानंतर कार्यकर्त्यांची हॉटेलमध्ये सोय केली जाते. या काळात हॉटेलमध्ये उधारी लावली जाते. हॉटेलमधून लाखो रुपयांचा व्यवसाय होतो. कार्यकर्त्यांना प्रचारामध्ये फिरण्यासाठी मोटारी दिल्या जातात. त्यामुळे मोटार मालकांचा व्यवसायही तेजीत असतो. फटाके, हार-तुरे, फोटोग्राफरच्या व्यवसायालाही या कालावधीत बळ मिळते. दरवेळी निवडणुकीपूर्वी किमान महिनाभर प्रचाराचा धुरळा उडत असतो. मात्र, या वेळी हे चित्र बदलले आहे. आघाडी की स्वबळ, महायुती की एकला चलो रे, याबाबत चित्र लवकर स्पष्ट होऊ शकले नाही. दुसरीकडे पितृपक्ष पंधरवडा आल्यामुळे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी एकही उमेदवार पुढे आला नाही. बुधवारी अमावास्येनंतरच गुरुवारपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार असून त्यानंतरच प्रचाराची स्थिती ठरू शकणार आहे.
शक्तिप्रदर्शनामध्ये सािहत्यांचा वापर सुरू होऊन व्यवसायाला बळ मिळेल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या तारखेनंतर म्हणजे १ ऑक्टोबरपासून ख-या अर्थाने प्रचाराला सुरुवात होणार आहे. १३ ऑक्टोबरला प्रचार संपेल. म्हणजे अवघे १३ दिवस प्रत्यक्ष प्रचाराची यंत्रणा राबणार आहे. एवढ्या कमी कालावधीत होणारी उलाढाल अल्प असेल, असे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. एकाही उमेदवाराकडून भोजन बनवून देण्यासंदर्भात अद्याप विचारणा झाली नसल्याचे हॉटेल व्यावसायिक सांगत आहेत. निवडणूक विभागाने खर्चावर निर्बंध घातले असले, तरी कोट्यवधींच्या उधळपट्टीमधून व्यावसाियकांना लाभ होत आहे.

१० कोटींची उलाढाल थांबली
विधानसभेसाठी उमेदवारांना खर्चाची २८ लाख इतकी मर्यादा घालून दिलेली आहे. वाढत्या महागाईमुळे हा खर्च वाढत जातो. त्यामुळे कमी बिले देऊन खर्च सादर केला जातो. एका मतदारसंघात प्रबळ असलेले किमान ३ उमेदवार प्रत्येकी ५० लाखांहून अधिक खर्च करतात. उस्मानाबाद जिल्ह्यात ४ विधानसभा मतदारसंघ असून धामधूम सुरूच नसल्यामुळे चार मतदारसंघांमध्ये १० कोटींहून अधिक उलाढाल ठप्प आहे.

उमेदवारांचा खर्च ५० लाखांवर (२००९ चे अनुमान)
प्रचार साहित्य-५ लाख
मोटार-वाहने-२० लाख
स्पीकर-मंडप-८ लाख
भोजनासाठी-१० लाख
फटाके-३ लाख
हारतुरे-१ लाख
हलगी वादक-६० हजार
पदयात्रा-२ लाख
मोटारसायकल रॅली-४ लाख

हंगाम असूनही व्यवसायाला घरघर, मजुरांची उपासमार
न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे डिजिटल होर्डिंग्ज लावण्यावर मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे एरवी होर्डिंग्ज बसवण्याचे प्रमाण अत्यंत कमी झाले असून निवडणुकीच्या कालावधीत काही प्रमाणात व्यवसाय सावरेल, अशी आशा असतानाही उमेदवार निश्चित नसल्याने अडचणी वाढल्या आहेत. आमच्याकडील काही मजुरांना अन्य कामावर पाठवले आहे. निवडणूक हा महत्त्वाचा हंगाम असूनही चित्र स्पष्ट नसल्यामुळे व्यवसायाला घरघर लागली आहे.
बलराज रणदिवे, राजमाता डिजिटल, उस्मानाबाद.