आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Maharashtra Assembly Election 2014 News In Marathi, Marathwada

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

युती-आघाडीचा घटस्फोटनंतर मराठवाड्यात चौरंगी लढती रंगणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीचा सामना २५ वर्षांपासून हातात हात घालून काम करणा-या भाजप-शिवसेनेला एकमेकांशीच करावा लागणार आहे. यात बीड वगळता पाचही ठिकाणी भाजपचे उमेदवार सज्ज आहेत.
बीडमध्येही शिवसंग्रामचे संस्थापक विनायक मेटे शनिवारी भाजप महायुतीतर्फे अर्ज भरणार आहेत. परंतु शिवसेनेकडून बीड वगळता पाचही मतदारसंघांत लढा देणारे उमेदवार भाजप आणि राष्ट्रवादीच्या तुलनेत कमकुवतच राहतील. सध्या बीड वगळता पाचही मतदारसंघांत भाजप-शिवसेनेला अनुकूल वातावरण होते. परंतु भाजप-शिवसेनेतील ताटातूट राष्ट्रवादीच्या पथ्यावर पडणारी आहे.

युती-आघाडीचा घटस्फोट
युती तुटल्याने व आघाडीत फूट पडल्याने मराठवाड्यातील लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. ४६ मतदारसंघांत चौरंगी लढत होणार असल्यामुळे भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

जालना : युतीच्या दोन जागा धोक्यात
जालना | महायुती तुटल्याने जिल्ह्यातील शिवसेना-भाजपची प्रत्येकी एक जागा धोक्यात आली आहे. महायुतीच्या जागावाटपात शिवसेनेकडे असलेल्या बदनापूर आणि भाजपकडे असलेल्या परतूर मतदारसंघांचा समावेश आहे. यापैकी बदनापूर येथे सध्या शिवसेनेचे संतोष सांबरे हे विद्यमान आमदार आहेत. या दोन मतदारसंघांशिवाय जालना, भोकरदन आणि घनसावंगी या मतदारसंघांत मात्र युती तुटल्याचा फारसा परिणाम होणार नाही.
हिंगोली : हिंदुत्ववादी मतदारांसमोर पेच
हिंगोली । लोकसभेत महायुती विरुद्ध काँग्रेस आघाडी अशा लढती झाल्याने हिंदुत्ववादी मतदारांना महायुतीचा भरवशाचा पर्याय दिसला. महायुती फुटल्याने आता हिंदुत्ववादी मतदारांसमोर पेच निर्माण झाला असून पक्षापेक्षा व्यक्तीला पाहून हे मतदान करण्याची शक्यता आहे.
लातूर । भाजप-सेनेला फटका बसणार
लातूर । महायुती तुटल्याचा फटका भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांना बसणार आहे. लातूर शहरामध्ये काँग्रेसच्या अमित देशमुखांविरोधात सेनेचे पप्पू कुलकर्णी आणि भाजपचे शैलेश लाहोटी रिंगणात असतील. राष्ट्रवादीकडून ज्येष्ठ विचारवंत डॉ. जनार्दन वाघमारे, अशोक गोविंदपूरकर, मकरंद सावे किंवा शहराध्यक्ष मुर्तुजा खान यांपैकी एक जण रिंगणात उतरू शकतो.
नांदेड : समीकरणे बदलणार
नांदेड | नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण, लोहा, हदगाव, देगलूर या मतदारसंघांत काँग्रेस-राष्ट्रवादी, सेनेच्या तुलनेत भाजपजवळ तुल्यबळ उमेदवार नाही. मुखेडमध्ये भाजपजवळ किशनराव राठोड, गोविंदराव राठोड हे तुल्यबळ उमेदवार आहेत.
उस्मानाबाद : उमेदवारांमध्ये अस्वस्थता
उस्मानाबाद । महायुती टिकावी यासाठी आग्रही भूमिकेत असलेल्या सेनेच्या उमेदवारांसह पदाधिकारी-कार्यकर्त्यांची अस्वस्थता कमालीची वाढली आहे. दुसरीकडे, आघाडीचेही सूत न जुळल्याने राष्ट्रवादीने काँग्रेसच्या मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात चारही मतदारसंघांमध्ये आता चौरंगी लढती होण्याची शक्यता आहे.