आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लातूरच्या वाट्याला ठेंगाच, उजनीहून पाणी आणण्याच्या योजनेचा उल्लेखच नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - चार महिन्यांपूर्वी लातूरमध्ये येऊन मंत्रिमंडळाची बैठक घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर घोषणांचा पाऊस पाडला होता. त्यातील केवळ टँकरसाठी निधी देण्याशिवाय एकही घोषणा पूर्ण झालेली नसताना मंगळवारी औरंगाबादच्या बैठकीत पुन्हा एकदा लातूरला ठेंगा दाखवण्यात आला आहे. मंत्रिमंडळात असलेल्या लातूरच्या संभाजी पाटील निलंगेकरांचा वकूब कमी पडल्याचेच यातून सिद्ध झाले आहे.

या वर्षी लातूर जिल्ह्याने अभूतपूर्व दुष्काळ अनुभवला. त्यातही लातूर शहरातल्या पाणीटंचाईची चर्चा देशाबाहेर पोहोचली. खरीप आणि रब्बी हंगाम गेल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला होता. जनावरांना खायला चारा नाही, पाजायला पाणी नाही, अशी स्थिती होती. त्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्च महिन्यात पहिल्यांदाच प्रत्येक मंत्र्याला एक तालुका अशा पद्धतीने वाटप करून लातूर, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यांचा पाहणी दौरा केला. मंत्र्यांनी आपला अहवाल त्यांच्यासमोर ठेवला आणि दुष्काळाची धग सरकारला जाणवली. त्या बैठकीत भाराभर घोषणा करण्यात आल्या. मात्र त्यातील बोटावर मोजण्याइतक्या गोष्टींचीही पूर्तता होऊ शकली नाही.

लातूर शहराला कायमस्वरूपी पाणीपुरवठ्यासाठी उजनी किंवा जायकवाडी धरणातून पाणीपुरवठा केला जाईल. त्याची व्यावहारिकता आणि उपयुक्तता तपासली जाईल. लातूरसाठीच तातडीच्या योजना म्हणून बेलकुंड, भंडारवाडी आणि डोंगरगाव येथून थेट जलवाहिनी अंथरली जाईल, अशी घोषणा करण्यात आली होती. त्यातील कायमस्वरूपी असलेल्या उजनीच्या योजनेबाबत काहीच हालचाल झाली नाही. उलट ऐन टंचाईच्या काळातही तातडीच्या म्हणून घोषित केलेल्या योजनांचा साधा प्रस्तावही तयार करण्यात आला नाही. केवळ टँकरच्या बिलांची पूर्तता करण्यात आली इतकेच. चारा डेपो सुरू करणार वगैरेसारख्या घोषणा तर हवेतच विरल्या. त्याची साधी चर्चाही नंतर झाली नाही. मंगळवारी औरंगाबादेत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतही लातूरच्या पाण्याच्या बाबतचा ठोस निर्णय घेण्यात आला नाही. सध्या काम सुरू होणार नसले तरी किमान उजनी धरणक्षेत्रातील पाण्यात लातूरसाठी वार्षिक गरजेपुरते आरक्षण करून ठेवण्याची मागणीही मान्य करण्यात आलेली नाही.

मागण्याच मांडल्या नाहीत : औरंगाबादयेथे यापूर्वी झालेल्या बैठकीत विलासराव देशमुख यांनी सातत्याने लातूरला झुकते माप दिले होते. या वेळेसच्या बैठकीत मात्र लातूरबाबत कुणीच पाठपुरावा केला नाही. मंत्रिमंडळात लातूरच्या पालकमंत्रिपदाची अपेक्षा बाळगून बसलेल्या संभाजी पाटील निलंगेकर यांनाही लातूर जिल्ह्यासाठी कोणतेही मोठे काम करून घेता आले नाही. त्याचबरोबर मंत्रिमंडळ बैठकीआधी लातूर जिल्ह्यातल्या आमदारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आपले प्रश्न मांडायला हवे होते. मात्र यासाठी आमदारांनी पुढाकार घेतला नाही. एखादी मोठी मागणी पदरात पाडून घ्यायची असेल तर सनदशीर मार्गाने, जनरेटा उभा करणे, मंत्रालयात पाठपुरावा करणे आवश्यक असते. मात्र, यात अपयश आले.

हे निर्णय राहिले अनिर्णीत
- उजनीचे पाणी लातूरला देणे, पाण्याचे आरक्षण मंजूर करणे
- सिंचन प्रकल्पांच्या कालव्याचे अस्तरीकरण
- उच्चस्तरीय बंधाऱ्यांच्या मावेजाची पूर्तता करणे
- कृषिआधारित उद्योगाची स्थापना करणे
- लातूर, बीड उ.बादसाठी हवामान केंद्र स्थापन करणे
- लातूरच्या विभागीय आयुक्तालयाची घोषणा करणे

स्वार्थासाठी तरी निर्णय घ्यायचा
लातूर महापालिकेची निवडणूक जवळ येऊन ठेपली आहे. ती जिंकायचा पण भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केला आहे. मात्र रेल्वेचे पाणी वगळता अद्यापपर्यंत एकही सकारात्मक निर्णय लातूरसाठी घेण्यात आलेला नाही. त्यामुळे लातूर महापालिका जिंकायची असेल तर लातूरकरांना दिलासादायक गोष्ट जाहीर करणे गरजेचे होते. मात्र तसे करण्यात आले नाही.

फुटकळ बाबींना मिळाली मंजुरी
लातूरच्या पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतनचा इतिहास जुना आहे. आजघडीला अभियांत्रिकीच्या जागा रिकाम्या राहतात आणि तंत्रनिकेतनला प्रवेश मिळत नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळे लातूरच्या शासकीय तंत्रनिकेतनचा दर्जा वाढवून तो अभियांत्रिकी महाविद्यालयाचा करावा, अशी मागणी कुणीही केलेली नव्हती. त्याला मंजुरी दिली आहे.
बातम्या आणखी आहेत...