आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बियाणे उद्योगाची उलाढाल 6 हजार कोटी; शेतकऱ्यांना मिळणार 600 कोटी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना - औरंगाबाद येथील मंत्रिमंडळ बैठकीत जालन्यासाठी सीड हब मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे उच्च गुणवत्तेचे बियाणे उत्पादन करणाऱ्या येथील बियाणे उद्योगाला त्याचा मोठा लाभ होणार आहे. हे हब कार्यान्वित झाल्यानंतर जिल्ह्यातील बियाणे उद्योगाची उलाढाल तीन हजार कोटींवरून सहा हजार कोटींवर पोहोचणार आहे, तर शेतकऱ्यांना त्याचा थेट लाभ होणार असून शेतकऱ्यांचे उत्पन्न चारशे कोटींवरून सहाशे कोटींवर पोहोचणार आहे.

बियाणांची पंढरी अशी ओळख असलेल्या जालना जिल्ह्यातील बियाणे उद्योगाने देशभरात आपली ओळख निर्माण केली आहे. महाराष्ट्रात या उद्योगातील उलाढाल पाच हजार कोटींची असून त्यातील जालना जिल्ह्यातील उलाढाल तीन हजार कोटींची आहे. या उद्योगातून सध्या जिल्ह्यातील १३ हजार ५०० लोकांना प्रत्यक्ष रोजगार मिळतो आहे तर २५ हजार लोक यावर अप्रत्यक्षरीत्या अवलंबून आहे. यात एकट्या जालना जिल्ह्यात २० हजार लोक प्रत्यक्ष बीजोत्पादन करीत आहेत. त्यासाठी खास नियंत्रित वातावरण उपलब्ध व्हावे म्हणून अनेक शेतकऱ्यांनी शेड नेट उभारले आहे. जालना जिल्ह्यात हा उद्योग भरभराटीस आला असला तरी या उद्योगाला अनेक अडचणी भेडसावत आहेत. आता त्या निकाली निघतील.

अशी असेल भागीदारी
बीजाेत्पादक शेतकरी, खासगी कंपन्या आणि शासन यांच्या सहभागातून हा प्रकल्प होत आहे. हबमध्ये १०९ कोटींची गुंतवणूक असेल. यात केंद्र ५० कोटी, खासगी उद्याेग ३४ कोटी ३० लाख तर राज्य २४ कोटी रुपयांची गुंतवणूक करणार.

देशातील पहिला प्रकल्प
बियाणेउद्योगांसाठी एकत्रित हब असणारा हा देशातील पहिलाच प्रकल्प असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली. या उद्योगामुळे गुणवत्तापूर्ण बियाणे निर्मितीसाठी मदत होणार आहे.

अल्पभूधारकांना होणार फायदा
बियाणेनिर्मितीतून शेतकऱ्यांना कमी जमिनीतून अधिक उत्पन्न मिळते. आता जिल्ह्यात सीड हब होत असल्याने येथील शेतकऱ्यांना उत्पन्नाचे शाश्वत साधन उपलब्ध होणार आहे. त्यातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

१०० एकर जागेची गरज
या प्रकल्पासाठी जालना शहरालगत शंभर एकर जागेची गरज असणार आहे. यात विविध बियाणे कंपन्या एकत्रित येऊन त्यांना आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधा तसेच त्यांच्या प्रयोगशाळा उभारू शकतील.

१५ बियाणे कंपन्या
वार्षिक शंभर कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या १५ बियाणे कंपन्या या भागात कार्यरत आहेत. अन्य ३५ कंपन्यांची वार्षिक उलाढाल १५ कोटीपर्यंत आहे. कोटी सरासरी उलाढाल असलेल्या कंपन्यांची संख्या दोनशे आहे.
बातम्या आणखी आहेत...