आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भल्याभल्यांना अंदाज बांधणे अशक्य;जातीपातीचे गणितही ठरणार निर्णायक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड/उस्मानाबाद/लातूर/हिंगोली/परभणी/नांदेड - मराठवाड्यातील सहा मतदारसंघांत गुरुवारी मतदान होणार असून भल्याभल्यांना अंदाज बांधणे अशक्य झाले आहे. बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली आणि नांदेडमध्ये दुरंगी लढतीचे चित्र असले तरी अपक्षांसह अन्य पक्षांच्या उमेदवारांनी मिळवलेल्या मतांवरच विजयाचे गणित अवलंबून आहे.

सन 2009 मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत याच सहा मतदारसंघांत सरासरी 57.23 टक्के मतदान झाले होते. विदर्भाप्रमाणेच मराठवाड्यातील या सहा मतदारसंघांत टक्केवारीत वाढ होणार का, याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे. नांदेड आणि लातूरमध्ये सभा घेऊन नरेंद्र मोदींनी भाजपमय वातावरण केले असून गुजरात विकासाचे मॉडेल मतदारांसमोर मांडले आहे. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही गुजरातच्या मॉडेलला ‘टॉफी’ मॉडेल म्हणून संबोधले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही बीड आणि परभणीची जागा मिळवण्यासाठी मतदारसंघ पिंजून काढले.

मोदींची विनोदात्मक टीकाही पवारांनी तितक्याच ताकदीने उपहासात्मक पद्धतीने पलटवून लावली होती. आधी दुष्काळ आणि नंतरच्या गारपिटीने कंबरडे मोडलेला मराठवाड्यातील शेतकरी कोणाच्या पारड्यात आपला कौल देतो, याची उत्सुकता लागली आहे.

लातूर : मोदी, राहुलच्या सभेने काट्याची टक्कर
लातूर - नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्या सभेमुळे लातूरमध्ये काँग्रेस-भाजपच्या उमेदवारांमध्ये काट्याची टक्कर होणार असल्याचे चित्र आहे. काँग्रेसकडून जिल्हा परिषद अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे तर भाजपकडून सुनील गायकवाड रिंगणात आहेत. मोदींच्या सभेमुळे काँग्रेसनेही आपली सर्व यंत्रणा कामाला लावली असून देशमुख कुटुंबीयांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. दरम्यान, मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने जय्यत तयारी केली असल्याचे जिल्हाधिकारी डॉ विपिन शर्मा यांनी सांगितले. 1898 मतदान केंद्रे आहेत. तेथे 213 क्षेत्रीय अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संरक्षणासाठी एक पोलिस अधीक्षक, 10 उपअधीक्षक, 20 पोलिस निरीक्षक, 92 उपनिरीक्षक, 2271 कर्मचारी, 700 होमगार्ड, दोन राखीव कंपन्या असा बंदोबस्त आहे.

उस्मानाबाद : प्रतीक्षा संपली, उत्सुकता वाढली
उस्मानाबाद - राष्ट्रवादीचे डॉ. पद्मसिंह पाटील, भाजप आघाडीचे रवींद्र गायकवाड यांच्यासह 27 उमेदवार रिंगणात असून आता मतदानाची प्रतीक्षा संपून निकालाची उत्सुकता वाढणार आहे. दरम्यान, मतदानाच्या प्रक्रियेसाठी यंत्रणा सज्ज असून अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. लोकसभेच्या निवडणुकीसाठी आजपर्यंतच्या तुलनेत सर्वाधिक उमेदवार लढतीत आहेत. त्यामुळे प्रशासनाला या वेळी दोन मतदान यंत्रांचा उपयोग करावा लागणार आहे. मंगळवारपासूनच मतदान यंत्रे, निवडणूक कर्मचारी, अधिकार्‍यांची व्यवस्था सुरू होती. मंगळवारी कर्मचार्‍यांना नेमून दिलेल्या भागात पाठवण्यात आले. त्यानंतर बुधवारी सकाळपासूनच मतदान यंत्रे घेऊन वाहने संबंधित भागाक डे रवाना झाली.

हिंगोली : राजीव सातव-वानखेडेंमध्ये रस्सीखेच
हिंगोली - मतदारसंघात काँग्रेसचे राजीव सातव आणि शिवसेनेचे सुभाष वानखेडे यांच्यात विजयासाठी प्रचंड रस्सीखेच चालू असली तरी बसप आणि भारीप- बहुजन महासंघ हे दोन पक्ष किती मतांचे विभाजन करतात यावरच या पक्षांच्या विजयाचे गणित मांडले जाणार आहे. सध्या 15 लाख 86 हजार 43 मतदार संख्या असलेल्या या मतदारसंघात 2009 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सूर्यकांता पाटील यांचा 70 हजारांपेक्षा जास्त मतांनी पराभव झाला होता. 2009 आणि 2014 चे मतविभाजन आणि विजयाचे गणितही त्याच कसोटीवर टिकणारे असल्याचे सध्या तरी दिसून येत आहे. बसपने 1 लाख 11 हजार, तर भारिप-बहुजन महासंघाने 52 हजार मते घेतल्याने राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव झाला होता.

नांदेड : अशोक चव्हाणांचे राजकीय भवितव्य ठरणार
नांदेड - माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण या मतदारसंघातून निवडणूक लढवत असल्याने संपूर्ण देशाचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. भाजपचे उमेदवार व माजी खासदार डी. बी. पाटील यांच्याशी चव्हाण यांची लढत आहे. एकूण 23 उमेदवार रिंगणात असून बसपचे डॉ. हंसराज वैद्य, समाजवादी पार्टीचे बालाजी शिंदे, आपचे नरेंद्र ग्रंथी, बमुपचे राजरत्न आंबेडकर हे प्रमुख उमेदवार रिंगणात आहेत. भाजपच्या प्रचारासाठी थेट नरेंद्र मोदींनी पहिल्याच दौर्‍यात हजेरी लावल्याने या निवडणुकीत चांगलीच चुरस निर्माण झाली. 16 लाख 86 मतदार कोणाच्या बाजूने कौल देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीच्या निकालावर त्यांचे राजकीय भविष्य अवलंबून असल्याने संपूर्ण देशाचे लक्ष या मतदारसंघाकडे लागले आहे.

बीड : मुंडे-धसमधील चुरस अखेरपर्यंत कायम
बीड - राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यमंत्री सुरेश धस लोकसभा निवडणुकीत खासदार गोपीनाथ मुंडे यांच्याविरोधात मैदानात उतरल्यापासून निर्माण झालेली चुरस अखेरपर्यंत कायम आहे. यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत अंदाज बांधणे अवघड झाले आहे. भाजपचे राष्ट्रीय नेते खासदार गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधात निवडणूक जिंकण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी बीड जिल्ह्यात तळ ठोकला. आरोप-प्रत्यारोपांमुळे निवडणुकीत अधिकच चुरस निर्माण झाली. अटीतटीचा सामना रंगणार हे सुरुवातीलाच स्पष्ट झाले. तेव्हापासून विजयाची गणिते मांडणार्‍यांना अद्यापही अंदाज येत नाही. गुरुवारी जिल्ह्यातील 2168 मतदान केंद्रांवर पावणेअठरा लाखांवर मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

परभणी : विजय भांबळे-बंडू जाधवांमध्ये लढत
परभणी - 17 उमेदवार रिंगणात असून महायुतीचे उमेदवार आमदार संजय जाधव व काँग्रेस आघाडीचे उमेदवार विजय भांबळे या दोघा प्रमुख प्रतिस्पध्र्यांत खरी चुरस आहे. प्रमुख राजकीय पक्षांसह राज्यस्तरावरील पक्ष व अपक्षांचा यात समावेश आहे. त्यात महायुतीचे आमदार संजय जाधव, काँग्रेस आघाडीचे विजय भांबळे, भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे कॉ.राजन क्षीरसागर, बहुजन समाज पक्षाचे गुलमीर खान यांच्यासह नोंदणीकृत राजकीय पक्षाच्या उमेदवारांत समाजवादी पार्टीचे अँड. अजय करंडे, आंबेडकर नॅशनल काँग्रेसचे अशोक अंभोरे, भारिप-बहुजन महासंघाचे मोहंमद इलियास मोहंमद अमीर मणियार, बहुजन मुक्ती पार्टीचे बबन मुळे, वेल्फेअर पार्टी ऑफ इंडियाचे सय्यद अब्दुल रहीम, आपच्या सलमा कुलकर्णी आदींचा समावेश आहे.